दोन पिढ्यांतील प्रेम, नातेसंबंध आणि सेवासुश्रुषेचे वास्तव उलगडणारा ‘आदि अनंत’; 57व्या इफ्फीत मराठी चित्रपटाची विशेष चर्चा – TMarathiNews
पणजी : दोन पिढ्यांमधील भावबंध, प्रेम, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि वृद्धांच्या सेवासुश्रुषेतील वास्तव यांचे संवेदनशील चित्रण करणारा ‘आदि अनंत’ हा मराठी चित्रपट 57व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) विशेष चर्चेत आला आहे. भारतीय पॅनोरमा विभागात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शक महेश लिमये यांनी पत्रकार परिषदेत चित्रपटाच्या निर्मितीमागील सर्जनशील प्रवास उलगडला.
सुमारे 137 मिनिटांच्या या चित्रपटात आदित्य या तरुण अभिनेत्याची आणि त्याचे उत्साही आजोबा अनंत राव यांची कथा मांडण्यात आली आहे. आदित्यची भूमिका संकर्षण कऱ्हाडे यांनी, तर अनंत राव यांची भूमिका ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी साकारली आहे. नुकताच पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलेल्या अशोक सराफ यांच्या अभिनयाची या चित्रपटात विशेष झलक पाहायला मिळते.
चित्रपटाची कथा आदित्यच्या आयुष्यातील संघर्षाभोवती फिरते. स्वतःला अभिनेता म्हणून सिद्ध करण्यासाठी धडपडणाऱ्या आदित्यवर एका अपघातानंतर अंथरुणाला खिळलेल्या आजोबांची काळजी घेण्याची जबाबदारी येते. एकीकडे अभिनय क्षेत्रातील स्वप्ने आणि दुसरीकडे आजोबांची सेवासुश्रुषा, अशा दुहेरी जबाबदाऱ्यांमध्ये तो अडकतो. यातून आजोबा आणि नातवाच्या नात्यात निर्माण होणारे भावनिक चढ-उतार चित्रपटात प्रभावीपणे मांडण्यात आले आहेत.
या चित्रपटाची कथा ऐकल्यानंतर आपण भावूक झालो होतो, अशी आठवण दिग्दर्शक महेश लिमये यांनी सांगितली. स्वतःच्या वडिलांच्या अखेरच्या दिवसांत त्यांची काळजी घेतानाचे अनुभव या कथेमुळे पुन्हा आठवल्याचे त्यांनी नमूद केले. कौटुंबिक जबाबदाऱ्या, वृद्धांची काळजी घेणाऱ्यांना सामोरे जावे लागणारे मानसिक ताण आणि यशाचा खरा अर्थ यांचा शोध या चित्रपटातून घेण्यात आला आहे. कथा मराठी भाषेत असली तरी तिचा भावनिक आशय देश-विदेशातील प्रत्येक कुटुंबाला जोडणारा असल्याचेही त्यांनी सांगितले.
चित्रपटाच्या संगीताबद्दल बोलताना लिमये यांनी प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांनी चित्रपटातील भक्तिगीत गायल्याची माहिती दिली. या प्रसंगात अशोक सराफ पडद्यावर तबला वाजवताना दिसतात. ज्येष्ठ अभिनेते असूनही अशोक सराफ यांनी आपल्या भूमिकेकडे नव्या कलाकाराप्रमाणे मोकळेपणाने पाहिले. तसेच अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे यांच्यातील परस्पर आदरामुळे पडद्यावरील आजोबा-नातवाचे नाते अधिक सहज आणि प्रभावी झाल्याचे लिमये यांनी सांगितले.
‘आदि अनंत’ या शीर्षकातूनही चित्रपटाचा आशय प्रतीकात्मक पद्धतीने व्यक्त होतो. ‘आदि’ म्हणजे सुरुवात, तर ‘अनंत’ म्हणजे कालातीतता. दोन पिढ्यांमधील नात्यांचा आणि काळाच्या प्रवाहात टिकून राहणाऱ्या भावबंधांचा वेध या शीर्षकातून घेतला आहे.
मुंबईतील जे. जे. कला महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेले महेश लिमये हे छायाचित्रणकार आणि दिग्दर्शक आहेत. त्यांच्या दिग्दर्शनातील पहिल्या ‘यलो’ चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. ‘जग्गू आणि ज्युलियेट’ या चित्रपटालाही महाराष्ट्र शासनाचा चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. ‘आदि अनंत’ हा दिग्दर्शक म्हणून त्यांचा तिसरा चित्रपट आहे. पत्रकार परिषदेत चित्रपटाच्या विविध पैलूंवर चर्चा झाली. शिवराज गंगवाल यांनी या संवादाचे सूत्रसंचालन केले.
Comments are closed.