पाकिस्तानबरोबर हॉकी खेळायला लाज वाटली पाहिजे! आदित्य ठाकरे आक्रमक

जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या जखमा अजूनही भरलेल्या नसताना आशिया कप हॉकी आणि ज्युनियर हॉकी विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तानी संघाला हिरवा कंदील देण्यात आला आहे. यूएईमधील आशिया कप स्पर्धेतही हिंदुस्थान-पाकिस्तान क्रिकेट सामना होण्याची शक्यता आहे. त्यावरून शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे आज आक्रमक झाले. पाकिस्तानबरोबर हॉकी, क्रिकेट खेळणे लज्जास्पद आहे, असा हल्ला त्यांनी केंद्र सरकारवर केला.

आदित्य ठाकरे यांनी विधान भवन आवारात पत्रकारांशी संवाद साधताना या मुद्द्यावरून मोदी सरकारवर टीका केली. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने पाकिस्तानला हिंदुस्थानात आशिया कप हॉकी स्पर्धेत खेळण्यास हिरवा कंदील दिला आहे. पुढे क्रिकेटचा आशिया कप होणार आहे. बीसीसीआयला थेट बोलता येत नसल्याने आधी हॉकी सामना होऊ द्यायचा आणि लोकभावनेचा अंदाज घेऊन क्रिकेटकडे वळायचे असे भाजपचे असेल तर त्याचे स्पष्टीकरण सरकारला द्यावे लागेल, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना अद्याप पकडण्यात आलेले नाही. त्यांचे स्केचही चुकीचे होते. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर खासदारांचे प्रतिनिधी मंडळ जगभरात गेले आणि मोठ्या नेत्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. असे करून मते मिळवू शकतो असे भाजपला वाटत असेल तर हे चालणार नाही. पाकिस्तानकडून दहशतवादाविरुद्ध कारवाई होईपर्यंत आपण जाहिरातींमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा मोह रोखू शकतो का? दहशतवाद पूर्णपणे नष्ट होईपर्यंत अशा घटनांमधून पाकिस्तानला लाभ होऊ देणार नाही याविषयी केंद्र सरकार ठाम राहू शकत नाही का, असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला. ते म्हणाले की, पहलगाम हल्ल्यातील आतंकवादी अद्याप पकडले गेले नाहीत, पण त्यानंतरही केंद्राने आशिया कप हॉकीमध्ये पाकिस्तानला खेळण्यास परवानगी दिली आहे. त्यानंतर बीसीसीआय आपला संघ पाकविरुद्ध आशिया कपमध्ये खेळवेल.

Comments are closed.