महाराष्ट्रातल्या तरुणांनो या अन्यायकारक राजवटीला जागे करण्यासाठी मुंबईत कधी येताय? आदित्य ठाकरे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पेपरफुटीच्या घटना घडत असल्याने वातावरण तापले आहे. औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकाऱ्यांसह सात जणांना अटक झाली आहे. या प्रकरणी हजारो विद्यार्थ्यांनी पुण्यात आज मोर्चा काढून एमपीएससीच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याबरोबरच आयोगाचा कारभार सुधारण्याची मागणी केली. त्यातच ‘एमपीएससी’ परीक्षेचा आणखी एक घोटाळा उघडकीस आला आहे. त्यावरून शिवसेना नेते, आमदार, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. तसेच तरुणांना या अन्यायकारक राजवटीला जागे करण्यासाठी मुंबईतकधी येताय ? असे आवाहन विद्यार्थ्यांना केले आहे.
आदित्य ठाकरे यांनी एक ट्विट करत हे आवाहन केले आहे तसेच सत्ताधाऱ्यांवर देखील त्यांनी जोरदार टीका केली. ”मित्रा, फडणवीस साहेब ऐकत नाहीत म्हणालास ते अगदी खरंय! सत्ताधाऱ्यांनी तरुणांचं ऐकलं असतं तर आंदोलनाची ही वेळच आली नसती. पण उद्धव साहेब, मी आणि आपला पक्ष सदैव तुमच्या सोबत आहोत. महाराष्ट्र पाहतोय की सरकार तरुणांवर कसं अन्याय करतंय. आम्हीही ऐकतोय आणि पाहतोय. आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्या सोबत राहू” असे आश्वासन आदित्य ठाकरे यांनी या ट्विटमधून विद्यार्थ्यांना दिले आहे.
तसेच या ट्विटमधून आदित्य ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना एक आवाहन देखील केले आहे. ”महाराष्ट्रभरातल्या प्रत्येक शहरातल्या तरुणांना एकच विचारतो, कधी येताय आपल्या मुंबईत, महाराष्ट्राच्या राजधानीत, या अन्यायकारक राजवटीला जाग आणायला?” असे त्यांनी या ट्विटमधून विचारले आहे.
Comments are closed.