हेच काय अच्छे दिन! रुपया विक्रमी नीचांकी पातळीवर, डॉलरच्या तुलनेत 93 वर पोहोचला; आदित्य ठाकरे यांचा निशाणा
जागतिक बाजारातील घडामोडी आणि आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाच्या हिंदुस्थानच्या चलन असलेल्या रुपयाला मोठा फटका बसला आहे. शुक्रवारी सकाळी बाजारात व्यवहार सुरू होताच रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ऐतिहासिक निचांकी पातळीला पोहोचला. रुपयाच्या इतिहासात पहिल्यांदाच डॉलरने ९३ रुपयांचा टप्पा ओलांडला असून आता रुपयाचा भाव ९३.२४ वर पोहोचला आहे. याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
आदित्य ठाकरे यांनी सोशल मिडीया इन्स्टावर स्टोरी पोस्ट केली आहे, त्यात त्यांनी म्हटले आहे की, रुपया विक्रमी नीचांकी पातळीवर $ च्या तुलनेत रुपया पहिल्यांदाच ९३ वर पोहोचला. ही बातमी ‘अच्छे दिन’वर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी. जेव्हा रुपया ६० वर पोहोचला होता, तेव्हा ओरडणारे ते आवाज आता कुठे गेले, असा प्रश्न पडतोय? असा सवालही त्यांनी केला आहे.
इस्रायल आणि इराणमधील वाढत्या संघर्षाचा परिणाम जागतिक बाजारपेठेवर झाला असून, सुरक्षित गुंतवणूक म्हणून डॉलरकडे कल वाढला आहे. क्रूड ऑईलच्या किमती प्रति बॅरल ११५ डॉलरच्या वर गेल्या आहेत. या सगळ्याचा थेट परिणाम रुपयावर झाला आहे. तसेच शेअर बाजारातून परकीय गुंतवणूकदारांनी (FII) मोठ्या प्रमाणात पैसा काढून घेतल्यामुळे रुपयावर दबाव वाढला आहे.

Comments are closed.