बदल घडवायचा असेल तर महायुतीचे भूत गाडावेच लागेल! आदित्य ठाकरे यांचा घणाघात

राज्यातील 29 महापालिकांवर सध्या सत्ताधाऱयांचे राज्य आहे. हे राज्य आहे की बजबजपुरी? रस्ते नाहीत, पाणी नाही, ड्रेनेज तुंबलेले! किती जणांना नोकऱ्या मिळाल्यात? शेतकरी कर्जमुक्त झाला का? किती दिवस या नरकयातना भोगत राहणार? बदल घडवायचा असेल तर मानगुटीवर बसलेले महायुतीचे भूत गाडावेच लागेल, असा घणाघात शिवसेना नेते, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला.
आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी छत्रपती संभाजीनगरात झंझावाती मशाल रॅली काढण्यात आली. क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून रॅलीला प्रारंभ झाला. या मशाल रॅलीने अवघे शहर उजळून निघाले. ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला’ अशा गगनभेदी घोषणांनी आसमंत दणाणून गेला. क्रांती चौकातून निघालेल्या रॅलीचे गुलमंडीवर जाहीर सभेत रूपांतर झाले. या वेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी महायुतीवर सडकून टीका केली. या रॅलीत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, उपनेते सुभाष पाटील, सहसंपर्कप्रमुख विजय साळवे आदी सहभागी झाले होते.
भाषणाच्या सुरुवातीलाच आदित्य ठाकरे यांनी जनतेच्या प्रश्नांना हात घातला. किती दिवस झाले पाणी आले नाही, असे त्यांनी विचारताच उपस्थितांनी अकरा दिवस झाले असे उत्तर दिले. किती जणांना नोकऱ्या मिळाल्यात, असे विचारताच – नाही, नाही असा आवाज गर्दीतून आला. मग ही परिस्थिती अशीच ठेवायची का बदल घडवायचा? राज्यातील बहुतांश महापालिकांवर सत्ताधाऱयांचे राज्य आहे, पण सुविधेच्या नावाने बोंबाबोंब! महायुतीचे हे भूत आपल्याला मानगुटीवरून उतरवावेच लागेल. बदल घडवायचा असेल तर महायुतीचे भूत गाडावे लागले आणि त्यासाठी 15 जानेवारीला घराघरातून मशालीला मतदान झाले पाहिजे, असे जोरदार आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले. दरम्यान, संस्थान गणपती मंदिरात महाआरती करून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.

Comments are closed.