भाजपसाठी बिल्डर आणि कंत्राटदारच महत्त्वाचे, मुंबईच्या प्रदुषणावरून आदित्य ठाकरे यांचा घणाघात
मुंबईत दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वायुप्रदूषणाबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुंबई आणि दिल्ली सर्वाधिक प्रदूषित शहर यादीत स्पर्धा करत असताना, राज्य आणि केंद्रातील भाजप सत्ताधारी नागरिकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
एक्सवर पोस्ट करून आदित्य ठाकरे म्हणाले की,मुंबईत भाजप सरकारसाठी बिल्डर आणि कंत्राटदारच महत्त्वाचे आहेत. बांधकाम आणि पाडकामांच्या कामांमुळे आणि विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल होत असल्याने प्रदूषण वाढले आहे.
आदित्य ठाकरेंनी दावा केला की, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे नियमन शिथिल करण्याची तयारी सरकारने सुरू केली असून ते ‘विकास’ म्हणजेच बिल्डरांसाठी खुले होण्याचा धोका आहे. त्यांच्या मते, हे पाऊल मुंबईच्या पर्यावरणासाठी धोकादायक ठरेल. नाशिकच्या तपोवनमधील झाडांप्रकरणी आदित्य ठाकरे म्हणाले की, ध्यान–आध्यात्मासाठी प्रसिद्ध असलेले तपोवन भाजप सरकारने नष्ट केले आहे. कुंभमेळा संपल्यानंतर हे क्षेत्र अदानी समूहाला दिले जाणार आहे.
भारतीय शहरांची मोठी संख्या ‘जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरां’ च्या यादीत झळकत असताना, भाजप सरकारने नागरिकांच्या आरोग्यावर पूर्णतः दुर्लक्ष केल्याचे ठाकरे म्हणाले. भाजप सरकारला नागरिक नव्हे, फक्त बिल्डर आणि कंत्राटदार महत्त्वाचे आहेत असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
पर्यावरणाचा ऱ्हास करणारेच मुंबई क्लायमेट वीक कसा आयोजित करणार? कोणत्या नैतिकतेने? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.
मुंबईचा AQI दिवसेंदिवस भयंकर होत असताना आणि “भयंकर AQI” शर्यतीत आम्ही दिल्लीशी स्पर्धा करत असताना, वरपासून खालपर्यंतची सरकारे, सध्या bjp आणि त्याचे मित्रपक्ष यांच्या नियंत्रणाखाली लोकांच्या दुर्दशेकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात.
मुंबईत बिल्डर आणि कंत्राटदार हे…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) 27 नोव्हेंबर 2025
Comments are closed.