मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुठला युती धर्म पाळत आहेत? माणिकराव कोकाटे प्रकरणी आदित्य ठाकरे यांचा सवाल

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना पदावरून हटवायला पाहिजे होतं, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुठला युती धर्म पाळत आहेत? असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

आज माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, गेल्या तीन महिन्यात 750हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. ज्या विधानभवनात कृषी खात्याबद्दलच सगळ्यात जास्त चर्चा झाली होती, ज्या विधानभवनात प्रत्येक आमदारांनी शेतकऱ्यांची व्यथा मांडल्या त्याच विधानभवनात कृषीमंत्री पत्ते खेळत बसलेले. ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. आपल्या राज्यात काय सुरु आहे. लातूरमध्ये हाणामारी झाली, त्या लोकांचा तुम्ही राजीनामा घेतलात पण कृषीमंत्र्यांचं काय? याच कृषीमंत्र्यांनी वादग्रस्त विधानं केली होती, तेच विधिमंडळात मोबाईलवर रमी खेळत होते. या सरकारमध्ये गांभीर्य आहे की नाही हा प्रश्न आहे. त्यांचा राजीनामा मागण्याची गरजही नव्हती. त्यांना पदावरून काढायला पाहिजे होतं. मुख्यमंत्री असा कुठला युती धर्म पाळत आहेत की त्यांच्यावर कारवाई केली जात नाही असे आदित्य ठाकरे म्हणाले.

कोणाचा डान्स बार असल्याचे समोर आलंय, कुणी विधानपरिषदेत रमी खेळतंय, कुणी हाणामारी करतंय, कुणी कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला मारतंय, कुणी पैश्यांची बॅग घेऊन बसलंय. पण सरकार कुठेही यांच्यावर कारवाई करत नाहिये. निवडणूक आयोगामुळे तुम्हाला पाशवी बहुमत मिळालंय पण हा माज आणि मस्ती आहे हे दुर्देवी आहे. स्वतःचे 136हून अधिक आमदार असताना हा कुठला युती धर्म आहे. मला आठवतंय की एके काळी आम्ही भाजपसोबत होतो तेव्हा मनमोहन सिंह पंतप्रधान होते. तेव्हा आम्ही त्यांना विचारायचो की तुम्ही आघाडी धर्म का पाळता? भ्रष्टाचारी नेत्यांवर कारवाई करा. आता हीच वेळ देवेंद्र फडणवीस यांच्यावर आली आहे असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

Comments are closed.