निवडणूक आयोगाची सर्कस झाली आहे! प्रारुप मतदार याद्यांमधील घोळावर आदित्य ठाकरे यांची टीका

निवडणूक आयोगाची सर्कस झाली आहे, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे. तसेच पूर्वीप्रमाणे मुक्त आणि पारदर्शक निवडणुका घेण्याची तटस्थता उरलेली नाही, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

मतदार यादीतील मोठ्या प्रमाणातील अनियमितता आणि मतदार फसवणुकीचे पुरावे समोर येऊनही निवडणूक आयोग कोणतीही कारवाई करत नाही, अशी टीका शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी ट्विटद्वारे केली आहे. आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, राजकीय पक्ष, मीडिया, नागरिक आणि आमच्या याचिकेनंतरही प्रारुप मतदारयाद्यांवरील हरकती नोंदविण्याची मुदत 7 दिवसांवरून 21 दिवसांपर्यंत वाढविण्याची मागणी मान्य केली नाही. तसेच हरकती मोठ्या प्रमाणात स्वीकारण्यास आयोगाने नकार दिला आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले की, लाखो मतदारांच्या नावांची याद्यांमध्ये पुनरावृत्ती झाली आहे. बनावट घरांची नोंद, EPIC क्रमांक नसलेले मोठ्या प्रमाणात मतदार, फोटो, नाव, पत्ता किंवा EPIC नसलेली मतदार कार्डे मोठ्या संख्येत आहेत. तसेच आयोगाने हरकतींची मुदत वाढवली नाही किंवा पडताळणीनंतर हरकती स्वीकारल्या नाहीत तर, स्पष्ट होईल की भाजप आणि निवडणूक आयोगाने निवडणुका फिक्स केल्या आहेत, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

तसेच त्यांनी निवडणूक आयोगावर टीका करत म्हटले की, निवडणूक आयोग आता एक सर्कस झाली आहे. पूर्वीप्रमाणे मुक्त आणि पारदर्शक निवडणुका घेण्याची तटस्थता उरलेली नाही, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

Comments are closed.