बीडीडीवासीयांना शुद्ध पाणी द्या, आदित्य ठाकरे यांची मागणी
वरळी बीडीडीतील पुनर्विकास झालेल्या नवीन इमारतींमधील रहिवाशांना शुद्ध पाणी द्या, अशी मागणी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी आज म्हाडाकडे केली. या इमारतींमध्ये पाण्यासह कचरा, सुरक्षा, पार्किंग, गॅस पाईपलाईनबाबत गैरसोयी जाणवत आहेत. नोडल अधिकारी नियुक्त केले करून रहिवाशांचे हे प्रश्न त्वरित सोडवण्यात यावेत, असे आदित्य ठाकरे यांनी नमूद केले.
वरळी बीडीडी पुनर्विकास प्रकल्पातील इमारत क्र. 1 मधील ‘डी’ व ‘ई’ विंगमधील 556 रहिवाशांना ऑगस्टमध्ये घरांचा ताबा दिला आहे. या रहिवाशांना भेडसावणाऱ्या समस्यांसंदर्भात आदित्य ठाकरे यांनी म्हाडा मुंबई मंडळाचे मुख्याधिकारी मिलिंद बोरीकर यांची आज भेट घेतली. सर्व रहिवाशांना 24 तास पुरेसा पाणीपुरवठा होईल याची काळजी घ्यावी, या नवीन इमारतींमध्ये बसविलेल्या एसटीपी टाकीची क्षमता किती लिटर आहे, असा प्रश्न उपस्थित करताना त्याची ऑपरेटिंग सिस्टम व दैनंदिन देखभाल प्रक्रिया याबाबत योग्य कार्यवाही करून बीडीडीवासीयांना दिलासा द्यावा, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली.
40 हजार रुपये भाडे द्या
बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत स्थलांतरित केलेल्या रहिवाशांना म्हाडाकडून दरमहा 25 हजार रुपये भाडे दिले जात आहे. मात्र, सद्यस्थितीत मुंबईतील वाढती महागाई, घरभाडय़ांतील लक्षणीय वाढ लक्षात घेता सदर भाडे रक्कम अपुरी ठरत आहे, तरी भाडे रक्कम किमान 40 हजार रुपये इतकी वाढवण्यात यावी, यादृष्टीने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणीदेखील आदित्य ठाकरे यांनी म्हाडाकडे केली.
समस्यांकडे वेधले लक्ष
लॉबी, लिफ्ट परिसर, मजल्यांवरील टेरेस, जिने आदी मुख्य ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत का? अग्निप्रतिबंध सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने या ठिकाणी आवश्यक उपाययोजना केल्या आहेत का, याची पाहणी करून योग्य कार्यवाही करावी, नवीन सदनिकांमध्ये इनविजिबल स्टील सुरक्षा ग्रील बसवावी, पुनर्वसित इमारतींसाठी स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, बगीचा देखभाल, सुरक्षारक्षक, प्लंबिंग, विद्युत तंत्रज्ञ, सुतार इत्यादी आवश्यक मनुष्यबळ नियुक्त झाले आहे का, याची दक्षता घ्यावी, इमारत क्र. 1 मधील ‘एफ’ व ‘जी’ विंगमध्ये ताबा देण्यापूर्वी फ्लॅटमधील गळती, दरवाजे व खिडक्या गुणवत्तेने बसविल्या आहेत का, याची तपासणी करावी, प्रत्येक सदनिकेसाठी पार्किंगची व्यवस्था योग्य पद्धतीने व्हावी तसेच गॅस पाईपलाइनचे कनेक्शन तत्काळ करावे, या मागण्या आदित्य ठाकरे यांनी केल्या.
Comments are closed.