Aaditya Thackeray hit the target after BJP leader Anurag Thakur photo with Pakistan cricketer went viral


मुंबई : भाजपा नेत्याचा पाकिस्तानच्या क्रिकेटपटूसोबत आनंद घेतल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. ज्यामुळे आता या फोटोवरून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरेंनी X या सोशल मीडिया साइटवर याबाबतची पोस्ट केली आहे. भाजपा नेते अनुराग ठाकूर यांचा हा फोटो व्हायरल झाला आहे. त्यामुळे विरोधकांच्या हाती आयते कोलीत लागले आहे. तर आदित्य ठाकरे यांनी भाजपा नेते अनुराग ठाकूर यांचा हा फोटो आपल्या अकाउंटवरून सुद्धा पोस्ट केला आहे. तर “मग आता सांगा गद्दार कोण?” असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. (Aaditya Thackeray hit the target after BJP leader Anurag Thakur photo with Pakistan cricketer went viral)

ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी X या सोशल मीडिया साइटवर पोस्ट करत म्हटले की, “अंधभक्त देशाला कुठे घेऊन जात आहेत ह्याचे हे उदाहरण आहे. मोहम्मद शमी आणि @Javedakhtarjadu जी यांच्यावर त्यांच्या देशभक्तीबाबत शंका घेतली जाते. का तर केवळ त्यांच्या धर्मामुळे. दोघेही भारतीय, आपल्या कर्तृत्वाने देशाच्या गौरवात भर घालणारे! पण हेच ट्रोल्स त्या भाजपा नेत्यावर बोलायला घाबरतात, जो आपल्या देशाच्या विरोधात उघडपणे बोलणाऱ्या क्रिकेटपटूसोबत काल बसलेला दिसला. ज्यांचा पक्ष प्रत्येक विरोधी पक्षातील नेत्यांना “पाकिस्तानला जा” असे वारंवार सांगतो, त्यांचे माजी मंत्री स्वतः रस्त्यावर “देश के गद्दारों को….” च्या घोषणा देतात, तेच काल शाहीद आफ्रिदी सोबत गप्पा मारत होते. ” असे आदित्य ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा… Sharad Pawar : नीलम गोऱ्हेंनी असे भाष्य केले नसते तर, शरद पवारांनी स्पष्टच सांगितले

तसेच, “मग सांगा, आता देशाचे गद्दार कोण?” असे लिहित त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “विचार करा, जर तो नेता भाजपाचा नसता, तर काय झालं असतं? त्याच्याविरोधात आंदोलनं, FIR झाले असते! त्याला देशविरोधी ठरवले गेले असते! आणि त्यालाही “पाकिस्तानला जा” असे म्हटले असते! त्यावर ठराविक प्रसारमाध्यमांमध्ये वादविवाद झाले असते ते वेगळेच… दुर्दैवाने, हीच भाजपाची नीती आहे; देशांतर्गत फूट पाडा, आपापसात भांडणे लावा, हिंदू-मुसलमानांमध्ये द्वेष पसरवा आणि सत्ता मिळवा. आत्ताही हे पाकिस्तानात बसून आपल्या देशाबद्दल वाईट उद्गार काढणाऱ्यांसोबत गप्पा मारत बसले आहेत. ह्यांचे नेते, नेत्यांची मुले परदेशी व्यवसाय करतात. काही तर देशविरोधी लोकांसोबत क्रिकेटच्या बहाण्याने पार्ट्या करतात, मॅच बघतात. बाकीच्यांची मुलं, आमचे तरुणांना मात्र – हे आपल्या राजकीय स्वार्थासाठी रस्त्यावर घोषणा आणि आंदोलनात पुढे ठेवतात आणि हो, जेव्हा भाजपाच्या सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांनी, बांग्लादेशातील हिंदूंवर हल्ले होत असल्याचे सांगितले, तेव्हा ह्याच भाजपाशासित BCCI ने मात्र सगळं माहित असूनही त्याच बांगलादेशसोबत क्रिकेट सामना खेळवला.” असे म्हणत त्यांनी आपल्या पोस्टमधून भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

तर, “निवडणुका झाल्याने भाजपा आता हिंदूना विसरलंय आणि देशभक्तीही विसरंलय. की मग आता भाजपाच्या देशभक्तीचा “टाइम प्लीज” आहे? जेव्हा ते तुम्हाला पुन्हा देशभक्ती आणि हिंदुत्व शिकवायला येतील, तेव्हा त्यांना त्यांच्या नेत्याचा, भारतविरोधी क्रिकेटपटूसोबत आनंद घेतानाचा फोटो दाखवा आणि विचारा,
हे त्यांना मान्य आहे का? आमची देशभक्ती आणि हिंदुत्व स्पष्ट आहे, भाजपसारखी चुनावी नाही. देशप्रेम आणि हिंदुत्व म्हणजे एकमेकांचा आदर करू, पण कोणत्याही प्रकारचा तिरस्कार-द्वेष सहन केला जाणार नाही, कोणाकडूनही नाही, कोणासाठीही नाही !” असेही आमदार आदित्य ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.





Source link

Comments are closed.