आता फक्त राष्ट्रपती भवन गुजरातला न्यायचं बाकी आहे, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यावरून आदित्य ठाकरे यांचा टोला

जैन धर्म हा शांततेत आधारित आहे, पण एखाद्यावर आपली विचारसरणी जबरदस्तीने लादणे ही हिंसाच आहे, असा घणाघात शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. तसेच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा यावेळी दिल्ली ऐवजी गुजरातमध्ये होणार आहे, त्यावरून आता फक्त राष्ट्रपती भवन गुजरातला न्यायचं बाकी आहे असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला.

मुंबईत पत्रकारांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, देशभरात हजारो सरकारी शाळा बंद झाल्या आहेत. अनेक शाळांमध्ये शौचालयासारखी सुविधाही शाळांमध्ये नाही. या सगळ्यांविरोधात शिवसेना आणि सीजेपी आवाज उठवत आहोत. आणि या बाबत लहान मुलं असो किंवा विद्यार्थी बोलायला लागले आहेत, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

पेपरफुटीचा विषय सरकारने जेवढ्या गांभीर्याने घ्यायला पाहिजे तेवढे घेत नाहिये. राज्यभरात विद्यार्थी आंदोलन करायला रस्त्यावर उतरले आहेत. हे तरुण आपल्या देशाचे भविष्य आहेत. पेपरफुटीवरून आंदोलनं करूनही काही बदल होत नाहिये, हे आपल्या राज्याचे दुर्दैवं आहे. आणि पुढे भविष्यात ही आंदोलनं तीव्र होत जातील, असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.

पर्यूषण काळात शाळकरी विद्यार्थ्यांनी डब्यात कांदा, लसूण आणि बटाटा आणू नये अशा सूचना जारी केल्या जात आहेत. यावर आदित्य ठाकरे म्हणाले की, आतापर्यंत अनेक दशकांत मराठवाडा आणि कोल्हापूर भागात इथेही मोठ्या संख्येने जैन लोकं राहतात आणि मिळून मिसळून राहतात. मुंबई महानगर प्रदेशात मात्र काही ठराविक लोक कांदा खाऊ नका, मांसाहार करू नका असे सांगतात. जैन धर्म हा शांततेत आधारित आहे. पण एखाद्यावर आपली विचारसरणी जबरदस्तीने लादणे ही हिंसाच आहे. हा वाद असाच वाढत गेला तर उद्या श्रावण संपल्यार आगरी कोळी बांधवांनी जैनांना आपल्या सणाचा नैवेद्या दिला तर चालेल का? बंगालमध्येही बाहेरून आलेल्या लोकांनी बंगाली लोकांना मासे खाऊ नका म्हणून सांगितलं तर त्यांन पळवून लावलं. म्हणूनच सर्वांनी आपपला धर्म पाळावा आणि दुसऱ्यावर लादू नये, असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

सुधार समितीत जे काही मोकळी मैदानं आहेत ती ढापण्याचा मिंधे गट आणि सरकारकडून सुरू आहे. सभागृहात बोलू देत नाहीत म्हणून शिवसेनेच्या नगरसेवकांनी सभागृहाबाहेर प्रतिसभा बोलावली होती. भाजपने मुंबई अदानीच्या घशात घालण्यासाठी सत्ता काबीज केली आहे.

फक्त राष्ट्रीय पुरस्काच नाही तर ऑलम्पिक गेम्स, वर्ल्ड कप फायनल सर्वकाही गुजरातला नेलं आहे. त्यामुळे हे केंद्र सरकार आहे की गुजरातचं केंद्र सरकार आहे असा प्रश्न उपस्थित होतो. आणि असंच असेल तर न्युक्लीअर प्लांट, ठाण्यात होऊ घातलेला डेटा सेंटरसुद्धा गुजरातला घेऊन जावा. आता फक्त राष्ट्रपती भवन गुजरातला न्यायचे बाकी आहे, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी यावेळी लगावला.

Comments are closed.