स्वतःच्या विभागाबाबत उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना समज द्यावी, आदित्य ठाकरे यांची मागणी

जी वचनं देऊन हे सरकार सत्तेत आले ते मुद्दे अर्थसंकल्पातच नाही, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केला. तसेच स्वतःच्या विभागाबाबत उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना समज द्यावी अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी केली.
आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे म्हणाले की, आज आम्ही राज्यपालांची भेट घेतली, काल वेळ मागितली आणि आज त्यांनी भेट दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. याच अधिवेशनाबद्दल दोन तीन मुद्दे आम्ही त्यांच्याकडे मागितले. विधानसभेत आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला, वेळ मागितला परंतु औरंगजेब असेल किंवा अबू आझमी असेल तर सत्ताधारीच सभागृह बंद पाडतात कारण त्यांच्याकडे अजेंडा राहिलेला नाही. सभागृहात प्रश्नोतराचा तास असेल किंवा लक्षवेधी असेल मंत्री बसतात, नसतात, सचिव असतात नसतात या विषयांवर गांभीर्यपूर्वक चर्चा झाली पाहिजे. आम्ही राज्यपालांना विनंती केली आहे की, त्यांनी सरकारच्या प्रतिनिधींना बोलावून समज द्यावी. मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना बोलावून समज द्यावी की मंत्र्यांनी स्वतःची उत्तरं स्वतः द्यावीत आणि अभ्यास करून उत्तर द्यावीत. विधानसभा किंवा विधानपरिषद सुरु असताना मंत्र्यांनी तिथे हजर रहावं. काल नाना पटोले प्रश्न विचारायला उभे राहिले तेव्हा एकच मंत्री उपस्थित होते. आम्ही जनेतेचे प्रतिनिधी म्हणून निवडून आलो आहोत आणि आम्ही जनतेचे प्रश्न मांडतो. सत्ताधारी आमदारांसारखे आम्ही सभागृह बंद पाडत नाही. पण विषयांवर चर्चा करताना मंत्र्यांमध्ये गांभीर्य असायला हवे.
तसेच गेल्या पाच वर्षांपासून माझ्या बदनामीचा प्रयत्न सुरू आहे. माध्यमं यांना साक्षी आहे. आम्ही या सरकारला अधिवेशनात एक्सपोझ केले आहे. फक्त आम्हीच नाही तर संघानेही या सरकारला उघडं पाडलं आहे. संघातलेही काही लोक बोलले ना की हा विषय चुकीचा आहे. मग आता भाजपचे मंत्री त्यांच्यावर कारवाई करणार का? महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय हाच प्रश्न आम्ही विचारतोय. महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढली आहे, महिला अत्याचार वाढलेत, शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट होतेय. महायुती सरकारने जी 10 वचनं दिली होती, त्यापैकी एकही मुद्दा या अर्थसंकल्पात आलेला नाही. प्रत्येक बाबतीत आम्ही त्यांना उघडं पाडलं, त्यांच्या एका मंत्र्याला राजीनामा द्यायला लागला. आज त्यांनी सभागृह कशावरून बंद पाडलं तर माझ्यावरून. पण जनता हाच प्रश्न विचारतेय की तुम्ही सत्ताधारी आहात तुम्हाला काम करायला निवडून दिले आहे, महाराष्ट्राबद्दल बोलायला निवडून दिले आहे. गेली पाच वर्षे माझ्या बदनामीचा प्रयत्न सुरु आहे आणि याबाबत मी कोर्टात उत्तर देईन असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
Comments are closed.