महाराष्ट्राचा अपमान करत रहायचा आहे का? नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावरून आदित्य ठाकरेंचा केंद्राला खरमरीत सवाल
आज दिवंगत लोकनेते श्री. दि.बा. पाटील यांची जयंती आहे. यानिमित्ताने शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी त्यांचे स्मरण करतानाच केंद्रातील भाजपवर निशाणा साधला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉम X वर आदित्य ठाकरे यांनी एक खरमरीत पोस्ट लिहिली आहे.
2022 मध्ये, महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव श्री. डी.बी. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे ठेवण्याचा निर्णय घेतला आणि केंद्र सरकारला शिफारस पाठवली. पण अद्यापही केंद्र सरकारकडे ही शिफारस मंजुरीसाठी पडून आहे.
तीन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. तसेच आपण केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांना (तेव्हाचे आणि आताचे) आठवण करून देण्यासाठी वेळोवेळी पत्र लिहिली असूनही, ती शिफारस प्रलंबित असल्याचा उल्लेख त्यांनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे.
तसेच नागरी उड्डाण मंत्र्यांनी आज च्या खास प्रसंगी हा प्रस्ताव मंजूर करावा, अशी विनंती देखील त्यांनी यावेळी केली आहे.
श्री डी.बी.पाटील यांची आज जयंती आहे.
2022 मध्ये, MVA सरकारच्या मंत्रिमंडळाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला श्री डीबी पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव देण्याचा निर्णय घेतला आणि केंद्र सरकारकडे शिफारस पाठवली.स्थिती: सरकारच्या मंजुरीसाठी प्रलंबित…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) १३ जानेवारी २०२५
त्यासोबतच, छत्रपती संभाजीनगर विमानतळाचे नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे ठेवण्याचा प्रस्ताव 2020 पासून केंद्र सरकारकडे प्रलंबित असल्याची आठवण देखील त्यांनी करून दिली आहे.
अशा प्रकारे प्रस्ताव प्रलंबित ठेवणे ही केंद्रातील भाजपच सरकारची पद्धतीच आहे का? की ते महाराष्ट्राचा अपमान करत राहू इच्छितात म्हणून असे आहे?, असे सवाल आदित्य ठाकरे यांनी आपल्या X पोस्टवरून उपस्थित केले आहेत.
Comments are closed.