मुंबईकरांची की कंत्राटदारांची, सरकार कोणाची सेवा करत आहे? आदित्य ठाकरे यांचा सवाल

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुंबईकरांच्या सेवासुविधा आणि समस्यांबाबत आवाज उठवला आहे. तसेच देवनार डम्पिंग ग्राऊंड स्वच्छ करण्यासाठी मुंबईकरांचा पैसा का खर्च करण्यात येत आहे, असा सवालही त्यांनी केला. तसेच बेस्ट बसची दरवाढ याबाबतही त्यांनी सवाल उपस्थित केला आहे. हे सरकार नेमकी कोणाची सेवा करत आहे? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

याबाबत आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, जनतेचे पैसे देवनार डंपिंग ग्राउंड स्वच्छ करण्यासाठी खर्च केले जात आहेत. देवनार डम्पिंग ग्राऊंड अदानी समूहाच्या घशात घालण्यात आले आहे आणि ते स्वच्छ करण्यासाठी मुंबईकरांचे पैसे का खर्च करण्यात येत आहेत, असा सवालही त्यांनी केला.

या सरकारने बेस्ट बसेस वाचवण्यासाठी एकही रुपया खर्च केलेला नाही. त्यामुळे मुंबईकरांवर बेस्ट भाडेवाढ लादण्यात आली आहे. तसेच मुंबईकरांवर पहिल्यांदाच “कचरा संकलन वापरकर्ता शुल्क” म्हणून अदानी कर आकारण्यात येत आहे, असा हल्लाबोलही त्यांनी केला. आमच्या सरकारच्या काळात बेस्टच्या तिकिटांच्या किमती सर्वसामान्यांना परवडणाऱ्या होत्या, त्या आता महाग झाल्या आहेत. तसेच प्रवाशांची संख्याही कमी झाली आहे.त्याचप्रमाणे बेस्ट बसेसची संख्याही कमी होत आहे. त्यामुळे सरकार कोणाची सेवा करते? निश्चितच मुंबईकरांची नाही, असे आदित्य ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Comments are closed.