महाझुटी सरकारचा स्वप्नदर्शक आणि बोगस अर्थसंकल्प; आदित्य ठाकरे यांचा घणाघात

राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून या अर्थसंकल्पात जनतेसाठी काहीही नाही. निवडणूक आयोगाने निवडून दिलेल्या या सरकारने जनतेसाठी अर्थसंकल्पात काहीही दिलेले नाही. एका वाक्यात सांगायचे तर महाझुटी सरकारने राज्यासाठी सादर केलेला बोगस अर्थसंकल्प आहे, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी अर्थसंकल्पावर टीका केली आहे.

याबाबत आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट केली आहे, त्यात त्यांनी म्हटले आहे की, महाझुटी सरकारने आज सादर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पाचे वर्णन एका शब्दात करायचे झाले तर अर्थसंकल्प बोगस आहे. भाजपच्या अपवित्र आघाडीने दिलेली कोणतीही आश्वासनांचा अर्थसंकल्पात समावेश नाही. त्यामुळे पुन्हा एकदा सिद्ध होते की भाजपला माहित आहे की त्यांचे महाराष्ट्र सरकार महाराष्ट्रातील जनतेच्या नव्हे तर निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने निवडून आले आहे. त्यांच्या जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा उल्लेखही करण्यात आला नाही.

लाडकी बहीण योजनेसाठी निधीचे वाटप कमी करण्यात आले आहे. तसेच घोषणा केल्याप्रमाणे लाडक्या बहीणींना 2100 रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्याचाही अर्थसंकल्पात उल्लेख नाही. मुंबईत दाखवलेली 64,000 कोटी रुपयांची कामे नवीन नाहीत, त्यापैकी बहुतेक कामे मुंबई महापालिका किंवा एमएमआरडीएद्वारे सुरू आहेत. त्यापैकी बहुतेक कामे उशिरा झाली आहेत. त्यामुळे योजनांचा खर्च वाढला आहे, असेही आदित्य ठआकरे म्हणाले.

मुंबईतील व्यापार केंद्रांचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, मुंबईला ‘गिफ्ट सिटी’ सारखेच फायदे मिळतील का? असा सवालही त्यांनी केला. दोन्ही विमानतळांमधील प्रस्तावित मेट्रो कनेक्टर अदानी उद्योगसमुहाने बांधला पाहिजे. दोन्ही विमानतळ त्यांच्याकडे असून महाराष्ट्र सरकारने यासाठी अदानी समुहाऐवजी करदात्यांचे पैसे का खर्च करावे? असा सवालही त्यांनी केला.

अनेक स्मारके आणि पुतळे याबद्दल अर्थसंकल्पात उल्लेख आहे. मात्र, अरबी समुद्रातील शिवस्मारकाचा उल्लेख नाही. 2017 च्या महानगरपालिका निवडणुकीपूर्वी लोकांची मते मिळवण्यासाठी पंतप्रधानांनाकडून याठिकाणी जलपूजन करण्यात आले होते. एकंदरीत, हा बोगस अर्थसंकल्प असून महाराष्ट्राच्या जनतेने नव्हे तर निवडणूक आयोगाने निवडलेल्या सरकारचा हा अर्थसंकल्प असल्याचे दिसून येत आहे. कोणत्याही अर्थपूर्ण गुंतवणुकीचा उल्लेख यात नाही. यातील प्रत्येक गोष्टीचा फायदा त्यांच्या कंत्राटदार मित्रांनाच होणार आहे. हा जनतेचा अर्थसंकल्प नसून त्यांच्या कंत्राटदार मित्रांसाठीचा अर्थसंकल्प आहे. जनतेसाठी काहीही नसलेला स्वप्नरंजन करणारा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

Comments are closed.