मतचोरीच्या विरोधात सर्जिकल स्ट्राईक, डाटा जनतेसमोर ठेवणार; आदित्य ठाकरे यांचा इशारा

राज्यातील विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतचोरीविरोधात सर्जिकल स्ट्राईक करणार, असा इशारा शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी दिला. मतचोरीचा संपूर्ण डाटाच जनतेसमोर ठेवणार असल्याचे सांगत त्यांनी सत्ताधाऱ्यांची धडधड वाढवली आहे. हा सर्जिकल स्ट्राईक असल्याने तो अकस्मात होईल, त्याची वेळ सांगू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये आदित्य ठाकरे यांची आज मुलाखत घेण्यात आली. त्यात बोलताना ते म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या आधी मतदारांच्या संख्येत अचानक झालेली वाढ, याद्यांमधून मतदारांची नावे गहाळ होणे, बूथवरील गैरव्यवस्थापन आणि मतचोरीबाबत शिवसेनेने निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. त्या संपूर्ण आकडेवारीवर शिवसेना काम करत आहे. लवकरच तो सर्व घोटाळा पत्रकार परिषद घेऊन आकडेवारीसह जनतेसमोर आणू, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरे यांनी या मुलाखतीमध्ये विधानसभा निवडणुका, आगामी महानगरपालिका निवडणूक आणि शिवसेना पक्ष व चिन्हावरून सुरू असलेल्या वादासंदर्भात आपले विचार स्पष्टपणे मांडले. विधानसभा निवडणुकीत बऱ्याच त्रुटी आढळून आल्या आहेत, त्याचा आम्ही अभ्यास करत आहोत, असे ते म्हणाले.

निवडणुकीचा निकाल आम्हाला मान्य आहे, पण निवडून आलेले सरकार नीट काम का करत नाही, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. राज्याचे उपमुख्यमंत्री कधी गावी दिसतात तर कधी दिल्लीत तक्रार करताना दिसतात, असा टोला त्यांनी हाणला.

हिंदुत्वावर प्रमाणपत्र देणारा भाजप कोण?

आदित्य ठाकरे यांनी यावेळी भाजपच्या हिंदुत्वावरदेखील भाष्य केले. भाजपसोबत जाणे म्हणजे हिंदुत्व आहे आणि काँग्रेससोबत जाणे म्हणजे हिंदुत्व नाही का? असा सवाल त्यांनी केला. राम मंदिर उभारण्यापूर्वी उद्धव ठाकरे तीन वेळा अयोध्येत गेले होते, शिवसेनेच्या देशभक्तीवर आणि हिंदुत्वाचे प्रमाणपत्र देणारा भाजप कोण? असेही आदित्य ठाकरे यांनी भाजपला सुनावले.

पुन्हा भाजपसोबत जाणे अशक्य

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भविष्यात भारतीय जनता पक्षासोबत जाणार अशा संभाव्य चर्चेबद्दल आदित्य ठाकरे यांना विचारण्यात आले. त्यावर, सरकार ज्या पद्धतीने चालवले जात आहे ते पाहता शिवसेना भाजपसोबत जाण्याची चर्चा अशक्य आहे, असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी शिवसेनेचे कधीच वाईट नव्हते, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशीही तितकेच चांगले संबंध होते याची आठवण त्यांनी करून दिली.

Comments are closed.