आदित्य ठाकरेंचा हल्ला… ही निवडणूक म्हणजे सेट मॅच!

पालिका निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेली प्रारूप मतदार यादी किचकट असून गोंधळ निर्माण करणारी आहे. निवडणूक आयोग सत्ताधाऱयांच्या कार्यालयात बसून कामकाज करीत आहे, असेच यावरून दिसून येते. त्यांना वॉर्ड बनवणे, वॉर्डच्या सीमारेषा आखणे जमलेले नाही. त्यांनी यादीच्या यादी उचलून दुसऱया यादीत टाकली आहे. मतदारांचे नाव आपल्या यादीत आहे की नाही हेदेखील समजत नाही. त्यामुळे आगामी निवडणूक म्हणजे ‘गेम सेट मॅच’ आहे, असा हल्ला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज केला.

आदित्य ठाकरे यांनी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेऊन प्रारूप मतदार यादीमधील गोंधळाची पोलखोल केली. आगामी निवडणुकीसाठी 7 नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात येणार होती, ती 20 नोव्हेंबरला जाहीर करण्यात आली. इतका वेळ का घेतला, असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला. या यादीतील गोंधळ आपण लवकरच जनतेसमोर आणणार आहोत, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले. मतदारांनीही आपल्या नावाची तपासणी यादीमध्ये करावी असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी शिवसेना सचिव सूरज चव्हाण, विभागप्रमुख संतोष शिंदे उपस्थित होते.

एका आठवड्यात गोंधळ जनतेसमोर आणार

सर्व महानगरपालिका निवडणुकांसाठी 1 जुलै 2025 ची यादी त्यांनी ग्राह्य धरली आहे. त्याविरोधात आपण मोर्चाही काढला होता. त्यामुळे या काळातील 18 वर्षे पूर्ण झालेल्यांना मतदानाचा अधिकार मिळणार नाही. आताच्या यादीत गोंधळ आहे. यादी रिडेबल नाही. या यादीतील गोंधळ येत्या आठवडय़ात आम्ही जनतेसमोर आणणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. मुंबई, पुणे यासारख्या महापालिका जिंकण्यासाठी, आमची शहरे लुटण्यासाठी त्यांचे काम सुरू आहे. याविरोधात आम्ही आवाज उठवणार आहोत.

बिहारमध्ये व्होटचोरी करून सत्ता

मतदार यादीत काही दुबार, तिबार मतदार, काही बोगस मतदार आहेत, तर काही ठिकाणी 10 बाय 10 च्या खोलीत 40-50 मतदार आहेत. एका दुकानावर मतदार नोंदवले होते. हा सगळा घोळ आपण जनतेसमोर आणला. सगळेच विरोधी पक्ष या घोळाबाबत बोलत आले आहेत. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हरयाणामध्ये कशाप्रकारे घोळ झाला ते जनतेसमोर आणले. बिहारमध्येही जेवढे मतदार आहेत त्यापेक्षा जास्त मतदान झाले आहे. काही दिवसांत तेथील घोळही उघड होईल. व्होटचोरी करून त्यांनी सत्ता स्थापन केली आहे, असे ते म्हणाले.

मतदानाचा हक्क हिसकावणाऱयांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

आपले नाव यादीत असते, मात्र मिंधे आणि भाजपने एका बुथमधील अनेक मतदार दुसऱया बुथमध्ये हलवले आहेत. विरोधी पक्षांचे उमेदवार पडतील, आपले उमेदवार जिंकून येतील, अशा प्रकारे प्रारूप याद्या बनवण्यात आल्या आहेत. त्यासाठी या याद्या येण्यासाठी वेळ लागला, असे ते म्हणाले. जर अधिकाऱयांना काम जमत नसेल तर त्यांना घरी बसवणे गरजेचे आहे. तसेच जाणूनबुजून असे केले असेल तर जनतेचा मतदानाचा हक्क हिसकावणाऱयांविरोधात देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी केली.

Comments are closed.