मिंधेंच्या भ्रष्टाचारामुळे मुंबईकरांचे हाल! पाणी तुंबले, रस्त्यावर खड्डे, मंत्र्यांचे फक्त फोटोसेशन; आदित्य ठाकरे यांचा घणाघात

मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबले असून रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे मुंबईकर हैराण झाले नाहीत. असे असताना मंत्री महापालिकेच्या आपत्कालीन विभागात जाऊन फक्त फोटोसेशन करीत असल्याचा घणाघात शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज केला. तत्कालीन फेकनाथ मिंधे यांच्या कार्यकाळात झालेल्या पाच हजार कोटींच्या भ्रष्टाचारामुळे मुंबईकरांचे हाल होत असल्याचेही ते म्हणाले.

तत्कालीन मिंधे सरकारच्या काळात भ्रष्टाचारामुळेच सर्व कामे निकृष्ट झाल्याने आता मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मात्र पालिकेकडून किती ठिकाणी आणि किती पंप लावले याची माहितीही पालिका देत नसल्याचेही ते म्हणाले. वरळीत पाणी तुंबले. विमानतळावरही पाणी तुंबले. मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवलीमध्येही पाणी तुंबल्याने रहिवाशांच्या घरात पाणी शिरल्याने नुकसान झाले. मिंध्यांमुळेच ही स्थिती निर्माण झाली. त्यामुळे या सर्व रहिवाशांना मिंध्यांनी स्वतःच्या खिशातील पैशाने मदत करावी, असे आव्हानही त्यांनी दिले. यावेळी आमदार सुनील शिंदे उपस्थित होते.

नगर विकास विभाग असलेले तत्कालीन मुख्यमंत्री फेकनाथ मिंधेंच्या काळात भ्रष्टाचाराचे पैसे त्यांच्या घरात पोहोचले. तेच फेकनाथ आता स्वतःला इन्फ्रामॅन समजून पुस्तके लिहिताहेत. मात्र त्यांनी मुंबईचे हाल पाहावेत, कारण त्यांनी मुंबई तुंबवून दाखवली आहे. ईडीच्या भीतीमुळेच ते भाजपसोबत गेलेत.

तुम्ही वॉर्ड ऑफिसर आहात का…

उपमुख्यमंत्री असलेले शिंदे काही ठिकाणी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेत असल्याच्या बातम्या दाखवल्या जात आहेत. मात्र हे काम करायला तुम्ही वॉर्ड ऑफिसर आहात का, असा सवालही त्यांनी केला. मंत्रालयाने पैसे न खाता काम केले असते तर मुंबईकरांचे हाल झाले नसते, असा टोलाही त्यांनी उपमुख्यमंत्र्यांना लगावला. गणेश मंडळांना 15 हजारांचा दंड प्रतिखड्डा जाहीर करता, मग तुमच्यामुळे पडलेल्या खड्डय़ांचे काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. सध्याचे मुख्यमंत्रीही गेल्या काही वर्षांपासून सत्तेत आहेत. मग असे असताना आजची स्थिती मुंबईत का निर्माण झाली, असा सवालही त्यांनी केला.

Comments are closed.