लाडक्या बहिणींमुळे नाही, पैसे गायब होताहेत ते भ्रष्ट मंत्र्यांमुळे; आदित्य ठाकरे यांचा महायुतीवर हल्ला

युवासेनाप्रमुख, शिवसेना विधिमंडळ पक्षनेते आदित्य ठाकरे यांनी विधिमंडळ परिसरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी लाडकी बहीण योजना आणि सरकारने निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांवरून आदित्य ठाकरे यांनी महायुतीचा समाचार घेतला. लाडक्या बहिणींचा भार नाही, पैसे गायब होताहेत ते भ्रष्ट मंत्र्यांमुळे, असा हल्ला आदित्य ठाकरे यांनी सरकारवर चढवला.

मुंबईतील प्रदूषणावरून आदित्य ठाकरे यांनी महापालिकेला धारेवर धरले. नागरिकांना जो त्रास होत आहे, सर्दी-खोकला, व्हायरल असेल, अॅलर्जीचा सर्दी-खोकला होतोय जे काही असेल त्याच्यातून सुटकेचा एकच विषय आहे, तो म्हणजे प्रदूषणावर काहीतरी ठोस पर्याय काढणं. पण कुठेही अजूनही महानगरपालिकेकडून काही उपक्रम दिसत नाहीये, काही कार्यक्रम दिसत नाहीये, जाग आलेली दिसत नाहीये हे दुर्दैवं आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

पर्यावरण मंत्र्यांना एकच विनंती करेन की छापील उत्तर जे शासनाकडून येतं ते वाचून दाखवण्याच्या आधी खरं काय आहे? कारण शासनाकडून हे खरे आहे, अंशतः खरे आहे, हे खरे नाही, असंच उत्तर येतं. ते उत्तर आणि जी बाहेर वस्तुस्थिती आहे यातील अंतर हे खिडकीतून बाहेर बघितल्यानंतर जाणवेल, असे आदित्य ठाकरे म्हणाले. हवेच्या गुणवत्तेमुळे शहरातील लहान मुलं, वृद्ध आणि नागरिकांच्या आरोग्यावर कोणताही परिणाम झालेला नाही, असे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या. त्यावर आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिले.

श्वानांसोबत अमानुष वर्तन करणाऱ्या राक्षसी प्रवृत्तीच्या व्यक्तींना भर चौकात शिक्षा द्या, आदित्य ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मराठा आरक्षणाचा विषय असेल किंवा शेतकरी कर्जमुक्तीचा विषय असेल, अशा कितीतरी घोषणा आपण निवडणुकीच्या आधी ऐकल्या होत्या. आता लाडक्या बहिणींचं काय झालं? किती लाडक्या बहिणी योजनेतून कमी केल्या आहेत. कदाचित हे पहिल अर्थसंकल्पीय अधिवेशन असेल ना विधान परिषदेत, ना विधानसभेत विरोधी पक्षनेता आहे. नेमकी भाजपला भीती एवढी का आहे? याचं उत्तर मिळत नाहीये. पण आता निवडणुका झाल्या म्हणजे सगळं काही स्थगित करायचं आणि आनंदात कारभार चालवायचा अशी मनस्थिती आहे का? अशी मनस्थिती असेल तर हे अधिवेशनपण गुंडाळा आपण कशाला रोज येतोय? असा हल्ला आदित्य ठाकरे यांनी चढवला.

मुंबईत लाखो मुंबईकर पागडी सिस्टीममध्ये चाळींमध्ये, इमारतींमध्ये राहतात. काही चाळींची स्थिती राहण्यासारखी नाहीये. आणि महानगरपालिका जे चाळे करत आहे त्याला एकच पर्याय आहे तो म्हणजे पागडीचा कायदा बदलून जे भाडेकरू आहेत म्हणजे पागडीमध्ये असतील किंवा नॉन सेस मालमत्ता या उपनगरात आहेत, सेस मालमत्ता या शहरात आहेत. दोन्हीकडे हा कायदा आणा. तिकडे जे राहतात त्यांना आधी संरक्षण द्या. त्यांना तुम्ही ओळख द्या. त्यांचे अधिकार सुरक्षित ठेवा आणि मगच पुढचा विचार करा. आम्ही कायद्यात तरतूद आणलेली आहे, ७९-ए आणि बी हे प्रकरण अजूनही सुप्रीम कोर्टात आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडे किंवा आपल्या राज्य सरकारकडून कोर्टामध्ये काही पाठपुरावा होतोय का? या मुद्द्यावर मागच्या अधिवेशनात बैठकीची मागणी केली होती. आता परत स्मरणपत्र लिहिले आहे की अजून बैठक मिळालेली नाहीये. म्हणजे निवडणुका होऊन गेल्यानंतर शहरी असो की ग्रामीण एकंदर नागरिकांकडे लक्षच द्यायचे नाही. नुसतं व्हीआयपी भेटींसाठी बॅनरबाजी करायची. पण नागरिकांकडे लक्षच द्यायचं नाही, असंच या सरकारने ठरवलेलं आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

पैसा नाहीये हे लाडक्या बहिणींमुळे नाही. जे सरकार सांगताय ना, लाडक्या बहिणींमुळे भार वाढलेला आहे, हे खोटं आहे. आम्ही शिवभोजन थाळी सुरू केली होती. कुठेही असा भार वाढत नाहीये. यांचा जो भार वाढलेला आहे किंवा पैसे जे गायब होताहेत ते यांच्या भ्रष्ट मंत्र्यांमुळे होताहेत, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला.

Comments are closed.