सत्ताधाऱ्यांचा काळा चहा पिण्यापेक्षा काळ्या धंद्यांविरोधात आवाज उठवला! – आदित्य ठाकरे

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

शिवसेना विधिमंडळ पक्षनेते आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारचे काम म्हणजे गंमतजंमतच असल्याची टीका करताना स्वतःला इन्फ्रा मॅन म्हणवणाऱ्यांनी राज्यातील एक तरी काम व्यवस्थित केल्याचे दाखवावे, असे आव्हान यावेळी दिले. चहापानाला जाऊन सरकारचा काळा चहा, कॉफी पिण्यापेक्षा त्यांच्या काळ्या धंद्यांविरोधात विरोधी पक्षाने आवाज उठवला आहे, असे ते म्हणाले.

महायुती सरकारच्या काळात राज्याची सामाजिक आणि आर्थिक घसरण झाली आहे. एकही गाव सुजलाम सुफलाम झालेले नाही. शेतकऩयांना पीक विमा मिळत नाही. शेतकरी आत्महत्यांचा मुद्दा गंभीर आहे. शहरी भागात बेरोजगारी वाढली आहे. इतकी गंभीर परिस्थिती असतानाही जनतेला खोटी आश्वासने द्यायची आणि सभागृहात काम रेटून न्यायचे असेच सुरू आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

मुलुंडमधील मेट्रो दुर्घटनेचा उल्लेख करत आदित्य ठाकरे यांनी यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. त्या दुर्घटनेत जीव गमावलेल्यांची सरकारने 5 लाख इतकी किंमत लावली मात्र दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई केलेली नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले. अशा घटनांमुळे राज्यात जनतेचे जगणे मुश्कील झाले आहे, कोणत्या क्षणी डोक्यावर काही आदळेल का ही भीती घेऊनच जनता प्रवास करत आहे, लोकांमध्ये इन्फ्रा मॅनची भीती आहे, असे ते म्हणाले. दुसरीकडे खरा इन्फ्रा मॅन मीच आहे हे दाखवण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू आहे, असेही ते म्हणाले.

कोस्टल रोडवर म्युझिक रोड केला, पण त्यावर साडेसात कोटी रुपये खर्च करण्याइतके काय आहे? जगातील आठवे आश्चर्य ठरावे असा पूल एमएमआरडीएने उभारला आहे पण असे पूल आणि त्यावर खर्च करून काय साध्य करणार? अशा कामांची चौकशी तरी झाली आहे का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.

विरोधी पक्षनेत्याची भीती का वाटते?

विरोधी पक्षनेत्याची नेमणूक न करण्यावरूनही आदित्य ठाकरे यांनी टीका केली. यापूर्वी विरोधी पक्षाला सरकारकडून सन्मान दिला जात होता आणि बहुमताचे सरकार असतानाही भाजपला विरोधी पक्षनेत्याची भीती का वाटावी असा आमचा प्रश्न आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

Comments are closed.