बीडीडीच्या ताबा पत्रातही फेक व्होटर्ससारखा घोळ, आदित्य ठाकरेंनी म्हाडाला फटकारले

वरळीतील बीडीडी चाळीच्या पुनर्विकासातील दोन इमारतींमधील घरांचा चावी वाटप सोहळा नुकताच पार पडला. मात्र या सोहळ्यात तब्बल 16 जणांना पुठ्ठ्यांच्या चाव्या देण्यात आल्य़ा तर फक्त 26 जणांना घराच्या खऱ्या चाव्या देण्यात आल्या. त्या विषयी बीडीडीतील काही रहिवाशांनी आदित्य ठाकरे यांच्याकडे काही तक्रारी केल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज एक पत्रकार परिषद घेत या सगळ्या गोष्टींचा समाचार घेतला.
”बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचा दोन इमारतींचा चावी वाटप सोहळा झाला. आज मला काही स्थानिक रहिवाशी भेटून गेले. चावी वाटप झालेल्यांपैकी 16 लोकांना पुठ्ठ्याच्या चाव्या दिल्या गेल्या. खऱ्या चाव्या अद्याप अनेकांना मिळालेल्या नाहीत. गेल्या आठवड्याभरात आम्ही एक अंदाज घेत होतो आता समजतंय की फक्त 26 लोकांना खऱ्या चाव्या दिल्या गेल्या. लोकांची अपेक्षा होती की गणेशोत्सवापर्यंत गृहप्रवेश होईल. मात्र म्हाडाने ज्या लोकांना चाव्या मिळाल्या आहेत त्यांना काही नियम लागू केले आहेत. प्रत्येक चावी घेण्यासाठी डॉक्युमेंट्सचे सहा सेट मागितले आहेत. ट्रान्झिट कॅम्पमधलं घर त्यांना 15 दिवसात रिकामं करायला सांगितलं आहे. म्हाडाने लोकांना किमान 1 महिना तरी द्यायला हवा होता. लोकांकडून म्हाडाने हमी पत्र मागितलं आहे. कसलं हमी पत्र हवं आहे यांना. तुम्हीच त्या लोकांना बीडीडीतून कॅम्पमध्ये शिफ्ट केलं होतं मग हमी पत्र का मागता? तुम्हाला माहित नाही का हेच लोकं आहेत ते. त्यामुळे 15 दिवसांची तसेच हमी पत्राची अट म्हाडाने काढून टाकावी. म्हाडाने दिलेल्या ताबा पत्रातही घोळ आहेत. अनेकांची नावं चुकवली आहेत. ताबा पत्र देखील फेक व्होटर्सच्या मतदार यादीसारखी झाली आहेत. साडे पाचशे लोकांमध्ये जर असा घोळ घालत असाल तर ही यंत्रणा कशी चालू आहे, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.
Comments are closed.