पाकशी क्रिकेट खेळण्याचे समर्थन कसे करणार? जगात शिष्टमंडळे पाठवणार का? आदित्य ठाकरे यांचे क्रीडा मंत्र्यांना खरमरीत पत्र

आशिया कपसाठी हिंदुस्थानी क्रिकेट संघ पाकिस्तानात पाठवण्याच्या निर्णयावर शिवसेना नेते, युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे यांनी कडाडून टीका केली आहे. ‘बीसीसीआयचे हे कृत्य लज्जास्पद आहे. पहलगाम हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचे सांगण्यासाठी आपण जगभरात शिष्टमंडळे पाठवली. त्याच पाकिस्तानशी क्रिकेट खेळण्याचे समर्थन कसे करणार, त्यासाठीही जगभरात शिष्टमंडळे पाठवणार का,’ असा रोकडा सवाल आदित्य ठाकरे यांनी मोदी सरकारला केला आहे.

आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांना यासंदर्भात खरमरीत पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी सरकारच्या दुटप्पी वर्तनावर बोट ठेवले आहे. ‘मागच्या दहा वर्षांत अनेक वेळा देशाने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यांचा सामना केला. दहशतवाद्यांचे तळ पाकच्या भूमीत असल्याचे आपल्या सरकारनेही वारंवार सांगितले. अलीकडेच, पाणी आणि रक्त एकाच वेळी वाहू शकत नाही असे पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावरून म्हणाले. असे असताना आशिया कप खेळण्यासाठी बीसीसीआय हिंदुस्थानी संघ पाकिस्तानात पाठवत आहे. केंद्र सरकार त्यावर काहीच भूमिका घेत नाही. बीसीसीआय देशापेक्षा, जवानांच्या बलिदानापेक्षा मोठी आहे का? बीसीसीआयपुढे पहलगाममध्ये सौभाग्य गमावलेल्या भगिनींच्या कुंकवाला काहीच मोल नाही का,’ अशी सरबत्तीच आदित्य ठाकरे यांनी पत्रातून केली आहे.

‘मानवतावादी दृष्टिकोनातून आजवर अनेक देशांना खेळाच्या मैदानातून हद्दपार करण्यात आले आहे. दहशतवाद हा मुद्दाही त्यासाठी कारण ठरला होता. या दहशतवादामुळे आपल्या देशाच्या शांततापूर्ण प्रगतीत अडथळे येत आहेत. तरीही बीसीसीआयच्या हट्टापायी, पैशाच्या लालसेपायी आणि जाहिरातीच्या महसुलासाठी जवानांचे बलिदान आणि भगिनींच्या कुंकवाचे मोल क्षुल्लक ठरवले जात आहे, असा संताप आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. ‘राजकीयदृष्टय़ा आपण वेगळ्या दिशेला असलो तरी याबाबतीत आपण माझ्या विचारांशी सहमत असाल आणि योग्य निर्णय घ्याल, अशी अपेक्षा आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.

Comments are closed.