घरे, व्यवसाय धारावीतच देण्याची हमी द्या, नाहीतर सर्व्हे होऊ देणार नाही! आदित्य ठाकरे यांचा इशारा

धारावीमध्ये गेल्या शंभर ते दीडशे वर्षांपासून राहणाऱ्या छोट्यामोठ्या व्यावसायिकांनी आपला उदरनिर्वाह करतानाच मुंबईच्या जडणघडीला मोलाचे योगदान दिले आहे. त्यामुळे धारावीचा पुनर्विकास करताना रहिवाशांना घरे आणि व्यवसाय धारावीतच मिळतील याची हमी द्या, नंतरच सर्वेक्षण करा अन्यथा सर्वेक्षण करू देणार नाही, असा इशारा शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज सरकारला दिला. कुणालाही मुंबई लुटून श्रीमंत होऊ देणार नाही, असा घणाघातही त्यांनी केला.

धारावी कुंभारवाड्यात जाऊन तेथील कारागीर आणि रहिवाशांशी आदित्य ठाकरे यांनी संवाद साधला व त्यांच्या व्यथा ऐकल्या. त्यानंतर बोलताना ते म्हणाले की, सरकारच्या आशीर्वादाने धारावीच्या पुनर्विकासाचे टेंडर अदानीला देण्यात आले आहे. मात्र पुनर्विकासाच्या नावाखाली या प्रकल्पग्रस्तांना धारावीबाहेर फेकण्याचा हा डाव आहे. कुणाला तरी जगात श्रीमंत व्हायचे म्हणून सरकारकडून अमाप सवलती देण्यात येत आहेत. मात्र धारावीकरांवर आम्ही अन्याय होऊ देणार नाही, शिवसेना तुमच्या पाठीशी कायम राहील! सर्वेक्षण करण्याआधी या ठिकाणच्या रहिवाशांशी संवाद साधा, मास्टर प्लॅनची माहिती देऊन या प्लॅननुसार पुढील पिढीलाही व्यवसाय कसा मिळणार ते सांगा, असेही ते या वेळी म्हणाले. धारावी बचाव समितीकडून आयोजित या कार्यक्रमप्रसंगी आमदार महेश सावंत, शिवसेना सचिव सुधीर साळवी, साईनाथ दुर्गे, माजी आमदार बाबूराव माने, माजी महापौर श्रद्धा जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

धारावीसारख्या पुनर्विकास प्रकल्पातून मुंबईकरांच्या व्यवसायावर गदा आणली जात आहे. मुंबईमधील व्यवसाय पळवले जात आहेत. मुंबईचे महत्त्व कमी करण्याचे हे कारस्थान आहे. धारावी ही फक्त झोपडपट्टी नाही, तर मुंबईमधील सोने आहे. मुंबईचा जीव आणि प्राण आहे. त्यामुळे या ठिकाणी सन्मानाने या, जोरजबरदस्ती चालणार नाही. कारण हा केवळ धारावीचा नाही, तर मुंबईचा लढा आहे! – आदित्य ठाकरे, शिवसेना नेते

आमिषांना बळी पडू नका, एकीची वज्रमूठ कायम ठेवा

धारावीची जागा सुमारे 300 एकर आहे. शिवाय अडीचशे एकर बाजूची जागाही पुनर्विकासासाठी देण्यात आली आहे. त्यामुळे धारावीकरांना याच ठिकाणी 500 फुटांचे घर द्यावे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. मेघवाडीमधील सर्वेक्षणात 80 टक्के रहिवाशांना छोटी घरे असल्याचे सांगत अपात्र ठरवले. त्यांना देवनार डंपिंग ग्राऊंड, गोवंडीत होणाऱया प्रकल्पात घरे देण्याचा डाव आहे. यासाठी आमिषाला बळी पडू नका, एकीची वज्रमूठ कायम ठेवा, असे आवाहन करतानाच धारावीत राहणाऱया सर्वांना घरे द्या, अशी मागणीही त्यांनी केली.

Comments are closed.