आम आदमी पार्टी आता 'भ्रष्ट' हातात आहे
राघव चड्ढा यांचा आरोप, शीशमहाल 2 चा उल्लेख
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आम आदमी पक्षाची ‘स्वच्छ’ प्रतिमा आता भंग पावली असून तो पक्ष ‘भ्रष्ट’ हातांमध्ये गेला आहे. त्यामुळे देशहिताचा विचार करणारे लोकांची त्या पक्षात कोंडी होत आहे. राज्यसभेचे 10 पैकी सात खासदार त्या पक्षातून बाहेर पडण्याचे हे प्रमुख कारण आहे, असा घणाघाती आरोप खासदार राघव चड्ढा यांनी केला आहे. चड्ढा यांनी या पक्षाच्या अन्य सहा राज्यसभा खासदारांसह नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. भारतीय जनता पक्षाचे ध्येयधोरणे पाहून आम्ही पक्षप्रवेश केला असून त्यात आमचा कोणताही स्वार्थ नाही, असे प्रतिपादन चड्ढा यांनी केले.
चड्ढा यांनी शनिवारी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली. आम आदमी पक्षाकडून जनतेच्या फार मोठ्या अपेक्षा होत्या. पण पक्षाचे नेतृत्व आज ज्यांच्या हाती आहे, ते नेते या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहेत. सर्वसामान्यांसारखी जीवनशैली त्यांनी सोडली असून ते अलिशान जीवन व्यतीत करण्यात धन्यता मानत आहेत. या पक्षातील हे परिवर्तन अविश्वसनीय आहे, अशी टीकाही राघव चड्ढ यांनी केली.
शीशमहाल-2 चे प्रकरण
आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री असताना त्यांनी सरकारी पैशाची उधळपट्टी करुन आपल्या शासकीय निवासस्थानाचे रुपांतर अलिशान प्रासादात केले होते, असा आरोप केला गेला आहे. या प्रासादाचा उल्लेख शीशमहाल असा होत आहे. या महालाच्या अंतर्भागाची छायाचित्रेही प्रसिद्द झाली होती. याचा फार मोठा फटका आम आदमी पक्षाला दिल्ली विधानसभा निवडणुकीत बसला होता. आता केजरीवाल यांच्यावर सरकारी पैशातून आणखी एक खासगी महाल बांधल्याचा आरोप होत आहे. भारतीय जनता पक्षाने या प्रासादाची छायाचित्रेही प्रसिद्ध केली आहेत. राघव चड्ढा यांनीही केजरीवाल यांच्यावर असाच आरोप केला आहे. त्यामुळे आता हे ‘शीशमहाल-2’ प्रकरण म्हणून ओळखले जात आहे. मात्र, आम आदमी पक्षाने ही छायाचित्रे बनावट असल्याचा प्रत्यारोप करत असा कोणताही राजप्रासाद नसल्याचे प्रतिपादन शनिवारी केले.
केजरीवाल उपराज्यपालांना भेटणार
आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल लवकरच देशाचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेणार आहेत. राघव चड्ढा आणि अन्य सहा राज्यसभा खासदार यांना भारतीय जनता पक्षाचे सदस्य म्हणून मान्यता देऊ नये. तसेच त्यांना भारतीय जनता पक्षाच्या खासदारांसमवेत सभागृहात बसण्याची अनुमती देऊ नये, अशी विनंती ते राधाकृष्णन यांना करणार आहेत.
केजरीवाल देशद्रोही आहेत
आम्ही आम आदमी पक्षाचे तत्वज्ञान आणि ध्येयधोरणे यांच्याशी नेहमीच निष्ठावंत राहिलो. तथापी, आम्हाला पक्षात किंमत दिली गेली नाही. आमची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे आम्हाला नाईलाजास्तव पक्षातून बाहेर पडावे लागले आहे. याला सर्वस्वी उत्तरदायी केजरीवाल हेच आहेत. आज ते आमच्यावर द्रोह केल्याचा आरोप करीत आहेत. तथापि, ते स्वत:च खरे गद्दार आहेत. त्यांनी जनतेचा विश्वासघात केला, असा आरोप स्वाती मलिवाल यांनी केला आहे. आम आदमी पक्षातून आणखी काही नेतेही बाहेर पडण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
Comments are closed.