बाजारात शापूला दरच मिळत नसल्याने व्यथित शेतकऱ्याने शेतावर रोटर फिरवला

कष्टाने लावले, पाणी घालून वाढवले, खतं टाकून जोपासलं… पण बाजारात न्यायला गेलं तर खर्चही परत मिळत नाही. मग या पिकाचं काय करायचं?” अशा व्यथित मनाने आंबेगाव तालुक्यातील भीमा येवले या शेतकऱ्याने शापूच्या पिकावर रोटर फिरवला.
शापू पिकाला बाजारात योग्य दर मिळाला नाही. एकरी खर्च भागत नसल्याने शेतीतून काही मिळकत होईल या अपेक्षेने केलेले कष्ट व्यर्थ गेले. भर पिक उभं असतानाच ते नष्ट करावं लागणं, हा शेतकऱ्याच्या आयुष्यातील मोठा आघात आहे.
दररोज पहाटे उठून शेतात जाऊन काम करणे, उन्हातान्हात राबणे, पिकाला लेकरासारखे वाढवणे — या सर्व कष्टांचा मोबदला मिळेल या आशेने शेतकरी शेती करतो. पण बाजारात दर कोसळल्याने आणि उत्पादन खर्चही न निघाल्याने शेतीतून मिळकतीऐवजी तोटा ओढवतो. परिणामी शेतकऱ्यांच्या डोळ्यातील आशा-माया पिकाबरोबरच रुतून जाते.
शेतीमालाला हमीभाव नसल्याने शेतकऱ्यांचा उद्रेक होत आहे. “कष्ट आम्ही करायचे, पण नफा दलालांचा आणि व्यापाऱ्यांचा; अशा व्यवस्थेत शेतकरी किती दिवस जगणार?” असा सवाल ग्रामस्थ आणि शेतकरी वर्गातून केला जात आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे योग्य मूल्य मिळावे, हा केवळ आवाज नाही तर जगण्यासाठीची हाक असल्याचे भीमा येवले यांच्या या कृतीतून स्पष्ट झाले आहे.
Comments are closed.