आपचे आमदार मंजिंदर लुलपुरा दोषी

युवतीला मारहाण अन् छेडछाडीचे प्रकरण

वृत्तसंस्था/ चंदीगड

पंजाबमधील आम आदमी पक्षाचा आणखी एक आमदार संकटात सापडला आहे. खडूर साहिबचा आमदार मनजिंदर सिंह लालपुरा समवेत 7  जणांना तरनतारनच्या जिल्हा न्यायालयाने मारहाण आणि छेडछाड प्रकरणी दोषी ठरविले आहे. पोलिसांनी आमदारासह सर्व गुन्हेगारांना ताब्यात घेतले आहे. या गुन्हेगारांना 12 सप्टेंबर रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. आमदाराने एका दलित युवतीला मारहाण केली होती.

ही घटना 2013 साली घडली होती. तेव्हा आमदार लालपुरा हे टॅक्सी चालक होते. तरनतारनच्या उस्मा गावातील एका युवतीने विवाहसोहळ्यादरम्यान छेडछाड अन् मारहाण केल्याचा आरोप लालपुरा यांच्यावर केला होता. छेडछाडीला विरोध केला असता टॅक्सीचालकांनी जबर मारहाण केली होती असे पीडितेचे सांगणे होते. तसेच घटनास्थळी पोहोचलेलया पोलिसांनीही कथित स्वरुपात युवतीलाच मारहाण केली होती. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. सर्वोच्च न्यायालयाने या घटनेची दखल घत परिवाराला सुरक्षा पुरविण्याचे आदेश दिले होते.

टॅक्सीचालक ते आमदार

दोषी टॅक्सीचालकांमध्ये मनजिंदर सिंह लालपुरा यांचा समावेश असून  ते 2022 मध्ये खडूर साहिब ग्रामीण मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे आमदार म्हणून निवडून आले होते. खडूर साहिब ग्रामीण हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता, परंतु आम आदमी पक्षाने तेथे विजय मिळविला होता. तर 2023 मध्ये आमदार लालपुरा यांचा तरनतारनचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक गुरमीत सिंह चौहान यांच्यासोबत मोठा वाद झाला होता, ज्यानंतर चौहान यांची बदली करण्यात आली होती.

Comments are closed.