पंजाबमधील आप आमदार दिल्लीत भेटले
दिल्लीतील पराभवानंतर केजरीवाल सतर्क
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आप संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमधील पक्षाच्या आमदारांची बैठक दिल्लीत बोलाविली होती. ही बैठक दिल्लीच्या कपूरथळा हाउसमध्ये पार पडली असून तेथे सर्व आमदारांसोबत मुख्यमंत्री भगवंत मान पोहोचले. पंजाबमध्ये आम आदमी पक्षात फूट पडू शकते असा कयास असल्याने केजरीवालांनी ही बैठक बोलाविली असल्याचे मानले गेले. याचदरम्यान बैठकीनंतर मान यांनी पक्षात फूट अन् पक्षांतराची चर्चा फेटाळली आहे. काँग्रेसने आधी स्वत:च्या आमदारांची गणना करावी, काँग्रेसने दिल्लीत स्वत:चे किती आमदार आहेत हे एकदा पहावे अशी खोचक टिप्पणी भगवंत मात यांनी केली आहे.
काँग्रेसचे नेते प्रताप सिंह बाजवा हे मागील तीन वर्षांपासून पंजाबमध्ये आम आदमी पक्षात फूट पडणार असल्याचे दावे करत आहेत. त्यांना अशाप्रकारचे दावे करण्याची सवयच जडली आहे. आमचे कार्यकर्ते प्रलोभनांना बळी पडणारे नाहीत. आम्ही हा पक्ष रक्त अन् घाम गाळून उभा केला आहे. आम्ही धर्म, गुंडगिरी आणि पैसे वाटण्याचे राजकारण करत नाही. दिल्लीत भाजपकडून मोठ्या प्रमाणात पैसे वाटण्यात आले आणि गुंडगिरीही झाली. आम्हाला दर तीन ते चार तासांनी निवडणूक आयोगाकडे धाव घ्यावी लागत होती. आता निकाल लागला असून तो आम्ही स्वीकारला आहे. पंजाबमध्ये आम्ही अनेक निवडणुका लढविल्या, परंतु असे प्रकार केले नाहीत असे मान यांनी म्हटले आहे.
पंजाबमध्ये आमचे सरकार येताच आम्ही आमदारांना 6-6 पेंन्शन देण्याचे धोरण संपुष्टात आणले. आता सर्वांना एकच पेन्शन मिळते. तर दिल्लीतील बैठक ही नियमित प्रक्रियेचा हिस्सा होती. पंजाबमधील महिलांना दर महिना 1 हजार रुपये देण्याचे आश्वासन आम्ही पूर्ण करणार आहोत. जी आश्वासने आमच्या घोषणापत्रात नव्हती ती देखील आम्ही पूर्ण करत आहोत असे उद्गार भगवंत मान यांनी काढले आहेत.
दिल्लीत एक दशकापर्यंत सत्तेवर राहिलेल्या आम आदमी पक्षाला दिल्लीत निवडणुकीत मोठा झटका बसला आहे आपला केवळ 22 जागा जिंकता आल्याने सत्ता गमवावी लागली आहे. तर भाजपने दिल्लीत स्वबळावर बहुमत मिळविले आहे. या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाच्या भवितव्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Comments are closed.