पंजाबमध्ये आपचे कार्यकर्ते संतापले

खासदार हरभजन सिंग, राजेंद्र गुप्ता यांच्या घरांच्या भिंतींवर लिहिले ‘गद्दार’

वृत्तसंस्था चंदीगड

आम आदमी पक्षाच्या सात खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पंजाबमधील ‘आप’ कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी जालंधरमध्ये राज्यसभा खासदार हरभजन सिंग यांच्या निवासस्थानाच्या भिंतींवर ‘गद्दार’ असे लिहून आपला संताप व्यक्त केला. तसेच लुधियानामध्ये आम आदमी पक्ष सोडून भाजपमध्ये सामील झालेल्या खासदार राजेंद्र गुप्ता यांच्या कार्यालयाच्या भिंतीवर ‘पंजाबचा गद्दार’ असे लिहिले होते.

आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री अमन अरोरा यांनी सात राज्यसभा खासदारांच्या भाजपमधील विलीनीकरणाला ‘निंदनीय’ असे म्हटले आहे. शनिवारी सुनाम दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलताना अरोरा यांनी पक्ष अशा धक्क्यांना घाबरत नाही, उलट प्रत्येक आव्हानातून अधिक मजबूत होऊन बाहेर पडेल असे स्पष्ट केले. खासदारांच्या पक्षांतरावर आश्चर्य व्यक्त करताना अमन अरोरा म्हणाले की, राजकारणात संयम आणि आपल्या भूमिकेवर ठाम राहणे महत्त्वाचे आहे. संदीप पाठक आणि राघव चड्ढा यांच्यासारख्या नेत्यांना पक्ष सोडण्यास कोणत्या दबावाने भाग पाडले हे आकलनशक्तीच्या पलीकडचे आहे. हे केवळ दुर्दैवीच नाही, तर लोकशाही मूल्यांच्याही विरोधात असल्याचे अरोरा म्हणाले. या खासदारांचे सदस्यत्व निलंबित आणि रद्द करण्यासाठी पक्ष योग्य कायदेशीर कारवाई करेल, असेही त्यांनी जोर देऊन सांगितले.

Comments are closed.