'आपले सरकार' वेब पोर्टल लवकरच सुरू होणार! तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे

राज्यातील नागरिकांना अत्यावश्यक सेवा देणारे ‘आपले सरकार’ हे वेबपोर्टल तांत्रिक अडचणींमुळे तात्पुरते बंद करण्यात आले असले तरी लवकरच ते पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येणार असल्याची माहिती इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार म्हणाले. पोर्टलमधील समस्यांचे निराकरण करण्यासाठी तज्ञांची समिती युद्धपातळीवर काम करत असून, प्रणाली अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम बनविण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.

महाराष्ट्र दिन : महाराष्ट्र दिनी आत्मदहनाचा प्रयत्न; 70 टक्के भाजलेल्या महिलेची प्रकृती चिंताजनक, परिवहन मंत्री शहरात असताना घडली घटना

27 एप्रिलच्या रात्रीपासून जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, शिष्यवृत्तीचे अर्ज आणि विविध स्पर्धा परीक्षांचे अर्ज तांत्रिक कारणांमुळे विस्कळीत झाले होते. या पोर्टलचा वापर करणाऱ्या लाखो नागरिकांची दररोज होणारी गैरसोय लक्षात घेऊन शासनाने तातडीने पावले उचलली आहेत.

या पार्श्वभूमीवर मंत्री शेलार यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीला विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच महाआयटीचे अधिकारी उपस्थित होते. तांत्रिक अडचणींचे मूळ शोधण्यासाठी आयटी तज्ञ, अभियंते आणि तंत्रज्ञान प्रमुखांची एक विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीने प्राथमिक तपासणी पूर्ण केली असून आवश्यक दुरुस्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
पोर्टल अधिक सुरक्षित, स्थिर आणि वेगवान बनवण्यासाठी विविध तांत्रिक सुधारणा अंमलात आणल्या जात आहेत. यासाठी मायक्रोसॉफ्ट, डेल आणि कॉमवॉल्ट या आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपन्यांच्या भारतीय प्रतिनिधींशी समन्वय साधून मार्गदर्शन घेण्यात येत आहे. सर्व तांत्रिक यंत्रणा आणि तज्ज्ञांचे पथक 24 तास कार्यरत असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

माथेरान न्यूज : आदिवासी कार्यकर्त्यांच्या आंदोलनाला अखेर यश, वनविभागाने डोंगरातून रस्ता तयार करण्यास मंजुरी दिली.

दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच ‘आपले सरकार’ पोर्टल पूर्ववत होईल, असा विश्वास मंत्री शेलार यांनी व्यक्त केला. नागरिकांनी संयम बाळगून सेवा केंद्रांशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
'आपले सरकार' हे राज्यातील सेवा वितरणासाठी एक महत्त्वाचे डिजिटल व्यासपीठ असून नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी थेट संबंधित आहे. विद्यमान तांत्रिक अडचणींवर मात करण्यासाठी आणि अधिक सक्षम, सुरक्षित आणि कार्यक्षम प्रणाली तयार करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे. लवकरच पूर्ण क्षमतेने पोर्टल सुरू करून नागरिकांना अखंडित सेवा देण्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Comments are closed.