'या' अनकॅप्ड भारतीय खेळाडूसाठी लागली कोट्यवधींची बोली; चार चेंडूंमध्ये घेतल्या आहेत 4 विकेट!
आयपीएल लिलावात अनकॅप्ड खेळाडूंना नेहमीच मोठी मागणी असते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेले, पण देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणारे खेळाडू अनेकदा कोट्यवधींच्या बोलीत विकले जातात. याच परंपरेला यंदाच्या लिलावात औकिब नबीने कायम ठेवले. जम्मू-काश्मीरचा हा वेगवान गोलंदाज आयपीएल लिलावात सर्वांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरला आणि अखेर दिल्ली कॅपिटल्सने त्याला मोठ्या रकमेत आपल्या संघात सामावून घेतले.
औकिब नबी 30 लाख रुपयांच्या बेस प्राइजसह लिलावात उतरला होता. मात्र त्याचं नाव पुकारताच अनेक फ्रँचायझींनी त्याच्यावर बोली लावायला सुरुवात केली. दिल्ली कॅपिटल्सने सर्वात आधी बोली लावली, त्यानंतर राजस्थान रॉयल्सनेही रस दाखवला. काही वेळातच बोलीची रक्कम झपाट्याने वाढू लागली. एक कोटीचा टप्पा पार होताच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबादही शर्यतीत उतरले.
औकिब नबीवर इतकी मोठी बोली लागण्यामागे एक महत्त्वाचं कारण म्हणजे अरुण जेटली स्टेडियमवरील त्याची प्रभावी कामगिरी. जम्मू-काश्मीरकडून खेळताना त्याने दिल्लीविरुद्ध याच मैदानावर 35 धावांत पाच विकेट घेतल्या होत्या. नव्या चेंडूसोबत स्विंग मिळवण्याची त्याची क्षमता आणि डेथ ओव्हर्समधील अचूक यॉर्कर्स यामुळे तो टी20 फॉरमॅटसाठी अत्यंत उपयुक्त गोलंदाज मानला जातो. दुलीप ट्रॉफीमध्ये नॉर्थ झोन विरुद्ध ईस्ट झोन सामन्यात चार चेंडूंमध्ये चार विकेट घेण्याचा पराक्रमही त्याने केला होता.
लिलावात अखेर निर्णायक क्षण आला तेव्हा सनरायझर्स हैदराबादने 8 कोटी 20 लाखांची बोली लावली. मात्र दिल्ली कॅपिटल्सने 8 कोटी 40 लाखांची अंतिम बोली लावत औकिब नबीला आपल्या ताफ्यात घेतले आणि एसआरएचने माघार घेतली.
दिल्ली कॅपिटल्ससाठी ही मोठी गुंतवणूक मानली जात आहे. औकिब नबी पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळताना दिसणार असून, घरच्या मैदानावर त्याची कामगिरी दिल्लीसाठी फायदेशीर ठरू शकते. जम्मू-काश्मीरचा हा वेगवान गोलंदाज आयपीएलमधून आपली वेगळी ओळख निर्माण करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Comments are closed.