मुंबई पोलिसांचा आता स्वतंत्र गुप्तवार्ता विभाग,आरती सिंह यांच्याकडे धुरा

नेहमीच दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असलेल्या मुंबईत मोठय़ा संख्येने महत्त्वाची ठिकाणे आहेत. शिवाय शहरात अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे येणे-जाणे चालूच असते. या पार्श्वभूमीवर मुंबईतील प्रत्येक बारीक गोष्टीची खडान्खडा माहिती असावी व त्यानुसार सर्वत्र करडी नजर ठेवता यावी यासाठी मुंबई पोलीस आयुक्तालयात स्वतंत्र गुप्तवार्ता विभाग निर्माण करण्यात आला असून आयपीएस अधिकारी आरती सिंह यांच्याकडे या विभागाची सूत्रे सोपवण्यात आली आहेत.

मुंबई पोलीस आयुक्तालयात सद्यस्थितीत पाच सहआयुक्त कार्यरत असून त्यांच्याकडे गुन्हे, कायदा व सुव्यवस्था, वाहतूक, आर्थिक गुन्हे शाखा व प्रशासन या विभागांचा पदभार आहे. त्यांच्या बरोबरीला आता सहआयुक्त गुप्तवार्ता हे नवे पद तयार करण्यात आले आहे. पोलीस आयुक्तांच्या अधिपत्याखाली गुप्तवार्ता विभागाचे सहआयुक्त कामकाज करतील. देवेन भारती यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाल्याने त्यांच्याकडे असलेले विशेष पोलीस आयुक्तपद रिक्त झाले होते. अपर पोलीस महासंचालक श्रेणीतील हे विशेष आयुक्ताचे पद आता ‘विशेष पोलीस महानिरीक्षक’ श्रेणीत अवनत केल्याचे गृह विभागाने जारी केलेल्या अध्यादेशात नमूद केले आहे. त्यानंतर गृह विभागाने आयपीएस अधिकारी आरती सिंह यांच्याकडे गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदाची जबाबदारी सोपविली. त्यांच्या नियुक्तीचे आदेश गृह विभागाने जारी केले. आता मुंबई पोलीस आयुक्तालयातील सहआयुक्तांची संख्या सहा झाली आहे.

– मुंबई शहरात महत्त्वाची ठिकाणे आहेत. शिवाय अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, व्यावसायिक, सिनेकलावंत, उद्योगपती मुंबईत वास्तव्यास आहेत. त्याचबरोबर देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय मंत्री तसेच अन्य देशांचे राष्ट्रप्रमुख, राजे आदी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे मुंबईच्या भेटीचे प्रमाण जास्त असते. दहशतवाद्यांचा धोकाही नेहमी असतो. त्यामुळे शहरातील प्रत्येक बाबींची माहिती असणे, प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवता यावे याकरिता सहआयुक्त गुप्तवार्ता हे काम करणार आहेत.

Comments are closed.