आयोग है तो मुमकीन है!आष्टात मतदानानंतर दोन हजार मतं वाढली, स्ट्राँग रूमवर कार्यकर्त्यांची धडक

आयोग है तो मुमकीन है… सांगलीतील आष्टा नगर परिषदेसाठी झालेले मतदान आणि प्रशासनाने जाहीर केलेली मतदानाची आकडेवारी यामध्ये मोठय़ा प्रमाणात तफावत असल्याचे आढळून आले. यामुळे ईव्हीएम ठेवण्यात आलेल्या ठिकाणी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी धडक दिली. आष्टा नगर परिषदेत 2049 मतदार कसे वाढले, असा सवाल आष्टा शहर विकास आघाडीने केला आहे. ईव्हीएमच्या सुरक्षिततेबाबतही यानिमित्ताने राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या जयंत पाटील यांनी शंका उपस्थित केली आहे.

आष्टा नगर परिषद निवडणुकीत मतदानासाठी वापरण्यात आलेली ईव्हीएम मशीन विलासराव शिंदे बहुउद्देशीय हॉल या ठिकाणी स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आली आहेत. प्रशासनाने रात्री दिलेल्या आकडेवारीत आणि सकाळी ऑनलाइन जाहीर केलेली मतदानाची आकडेवारी यामध्ये जवळपास दोन हजार मतांची वाढ झाल्याचे निदर्शनास आले. यानंतर आष्टा शहर विकास आघाडीचे कार्यकर्ते आणि मतदारांनी स्ट्राँग रूमच्या बाहेर एकच गर्दी करत प्रशासनाला धारेवर धरले. दरम्यान या गोंधळानंतर जयंत पाटील यांनी स्ट्राँग रूमच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तेथील सुरक्षा व एपंदर व्यवस्थेची पाहणी केली.

निवडणूक अधिकारी काय म्हणाले?

जिल्हा निवडणूक आयोगाला आणि राज्य निवडणूक आयोगाला जी आकडेवारी कळवली ती नमुना ईव्हीएम 3 नुसारच आहे. त्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. मतदानाच्या आकडेवारीबाबत केवळ संभ्रम झालेला आहे, असे उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

आरोप काय?

आष्टा नगर परिषदेची मतदार संख्या 30,574 एवढी आहे. प्रत्यक्ष 22,864 मतदान झाले आहे. पोर्टलवर जाहीर केलेल्या मतदार यादीत एकूण मतसंख्या 33,328 दाखवली आहे. झालेल्या मतदानाची आकडेवारी 24,913 दाखवली आहे, तर प्रत्यक्ष मतदान 22,864 इतकेच झाले. प्रशासनाने जाहीर केलेल्या मतदानाच्या आकडेवारीत तब्बल 2000 मतांचा फरक असल्याचा आरोप वैभव शिंदे यांनी केला आहे.

– आष्टा शहर विकास आघाडीचे विशाल शिंदे हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत, तर अजित पवार गटकाडून प्रवीण माने हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत.

– स्टाँग रूमबाहेर 24 तास सीसीटीव्ही पाहिजेत, प्रत्येक उमेदवाराचा प्रतिनिधी स्ट्राँग रूमबाहेर पाहिजे, या भागात जॅमर बसवा, अशी मागणी आघाडीने केली.

स्ट्राँग रूमबाहेर एलसीडीद्वारे प्रक्षेपण करा – जयंत पाटील

महाराष्ट्रातील सर्वच मतदान पेंद्रे आणि ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रूमच्या आतमध्ये आणि बाहेर दोन्ही ठिकाणी पॅमेरे लावावेत तसेच रूमच्या बाहेर एक मोठा डिस्प्ले एलसीडीच्या माध्यमातून उभारण्यात यावा, तो जनतेसमोर ठेवावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते आमदार जयंत पाटील यांनी केली आहे.

गोंदियात ईव्हीएमचे सील काढल्याने तणाव

गोंदिया जिह्यातील सालेकसा नगर पंचायतीचे मतदान पूर्ण झाल्यानंतर सर्व मशीन सील करून स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यासाठी तहसील कार्यालयात नेण्यात आल्या, परंतु तिथे 17 प्रभागांतील ईव्हीएमचे सील तोडून पुन्हा ऑन करण्यात आल्याचा आरोप उमेदवारांनी केला. निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका कांबळे यांनी स्वीच ऑन ऑफ आहे की नाही हे पाहण्यासाठी आम्ही पंट्रोल युनिट पाहिले, असा खुलासा केला.

महापालिका निवडणुका कधी? आयोगाने बोलावली सर्व आयुक्तांची बैठक

नगर परिषदा आणि नगर पंचायतींनंतर आता महापालिका निवडणुकीचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. राज्य निवडणूक आयोगाने उद्या मुंबईसह 29 महापालिका आयुक्तांची बैठक बोलवली आहे. या बैठकीत प्रारूप मतदार याद्या आणि निवडणूक तयारीबाबत माहिती घेतली जाणार आहे. महापालिका आयुक्तांची निवडणूक सज्जता लक्षात घेऊन आयोग सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम तयार करणार आहे.

नगरपालिका-पंचायत 67.63 टक्के मतदान, तब्बल 24 तासांनंतर आकडेवारी जाहीर

राज्यात 2 डिसेंबर रोजी पार पडलेल्या नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या 264 अध्यक्षपदांच्या आणि 6 हजार 42 सदस्यपदांच्या जागांसाठी एकूण 67.63 टक्के मतदान झाले आहे. राज्य निवडणूक आयोगाने तब्बल चोवीस तासांनंतर ही अधिकृत आकडेवारी जाहीर केली आहे. सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्हय़ातील मुरगुड येथे 88.43 इतके झाले आहे. त्या खालोखाल मलकापूर (कोल्हापूर) – 86.99 टक्के इतके झाले आहे.

Comments are closed.