सरकार वठणीवर आले नाही तर तेही बदलू! दीपके यांचा इशारा

‘नीट’ पेपरफुटीच्या विरोधात दिल्लीच्या जंतरमंतरसह देशभरात आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना पुन्हा त्रास आणि धमक्या दिल्या जात आहेत. सरकारने सुधारावं, आता फक्त केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला आहे. सरकार जर वठणीवर आलं नाही तर विद्यार्थी उद्या हे सरकारही बदलतील, असा इशारा कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी दिला आहे.

देशातील ‘जेन-झी’ पिढीला सोबत घेऊन सीजेपीने ‘नीट’ पेपर फुटीच्या प्रकरणात पेंद्रातील मोदी सरकारविरोधात यशस्वी लढा दिला. यानंतर अभिजित दीपके तब्बल 40 दिवसांनंतर छत्रपती संभाजीनगर येथील आपल्या घरी परतले. यावेळी येथील तरुणांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना दीपके यांनी केंद्रातील मोदी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला.

36 दिवसांनंतर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आलं याचा आनंद होतोय. सरकारने आता तरी सुधारावं. 20 जुलै रोजी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला आणि रस्त्यावर रक्त सांडलं. एवढं रक्त वाहूनही सरकारचं मन भरलं नाही. आता वेगवेगळ्या राज्यातील विद्यार्थ्यांना कारवाईची धमकी दिली जात आहे. पोलीस घरी जाऊन त्रास देत आहेत. हे विद्यार्थी देशाचे भविष्य आहेत. सरकारने असंच काम केले तर विद्यार्थी उद्या सरकारही बदलतील, असे दीपके म्हणाले.

भाजपला लाज वाटली नाही का?

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सीजेपीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या पार्टीवर होत असलेल्या टीकेबाबत दीपके म्हणाले की, भाजपाचे लोक निवडणूक जिंकल्यावर रस्त्यांवर जल्लोष करतात. आम्ही रस्त्यावर न करता तो आतमध्ये केला. एक दिवस एन्जॉय केला असेल तर त्यात वाईट काय? 21 विद्यार्थ्यांच्या आत्महत्येनंतर ज्या प्रकारे प्रधान यांचे संसदेत स्वागत केले गेले, त्याची भाजपाला लाज वाटली नाही का, असा प्रश्न दीपके यांनी केला.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन युवकांचा राग कमी झालेला नाही. हा राग सरकारवर होता. त्यामुळे त्यांनी आंदोलकांचा छळ करणे सोडून द्यावे, अन्यथा येणाऱ्या निवडणुकांमध्ये ते सरकारला धडा शिकवतील.

मोदी चांगले इन्फ्लुएन्सर, त्यांनी खुर्ची सोडावी

पंतप्रधान मोदी यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करण्यास सुरुवात केली आहे. याबाबत पत्रकारांनी अभिजित दीपकेंना प्रश्न केला असता ते म्हणाले, ‘मला वाटते पंतप्रधान मोदींनी आता इन्फ्लुएन्सर बनायला हवे. इन्फ्लुएन्सर म्हणून ते चांगले काम करत आहेत. पंतप्रधानांची खुर्ची त्यांनी सोडावी. ते काम दुसरा नेता करेल.

Comments are closed.