सुदर्शनऐवजी अभिमन्यूला संधी मिळायला हवी होती! अभिमन्यू ईश्वरनच्या वडिलांचे मत

हिंदुस्थानी कसोटी संघात सलामीवीर अभिमन्यू ईश्वरनला लवकरच संधी मिळेल, असा विश्वास मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी दिला होता, पण संधी मिळाली नाही. तसेच सुदर्शनऐवजी अभिमन्यूला कसोटी संघात स्थान मिळायला हवे होते, असे मत व्यक्त केलेय अभिमन्यू ईश्वरनचे वडील रंगनाथन ईश्वरन यांनी. नुकत्याच इंग्लंडविरुद्ध झालेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतही अभिमन्यूला संघात स्थान मिळाले नाही. तिसऱ्या क्रमांकावर करुण नायर व साई सुदर्शन यांना संधी देण्यात आली, मात्र या दोघांच्या मिळून दहा डावांत फक्त एकेक अर्धशतक अशीच कामगिरी झाली.
आपल्या मुलाला केवळ बेंचवर बसवण्याचीच संधी मिळाल्यामुळे रंगनाथन ईश्वरन खूपच निराश झाले आहेत. ते म्हणाले, गौतम गंभीर यांनी माझ्या मुलाशी बोलताना त्याला आश्वासन दिले की, तू योग्य मार्गावर आहेस, तुझी वेळ येईल, तुला लांब पल्ल्याची संधी मिळेल. मी दोन-तीन सामन्यांनंतर खेळाडूला बाहेर टाकणाऱ्यांपैकी नाही. तुला पुरेसा वेळ देईन. माझ्या मुलाने मला हेच सांगितले. पूर्ण प्रशिक्षक पथकाने त्याला विश्वास दिला आहे की, त्याला त्याचा हक्क मिळेल. माझा मुलगा चार वर्षांपासून संधीची वाट पाहतोय. त्याने 23 वर्षे कठोर परिश्रम केले आहेत.
रंगनाथन यांनी आपल्या मुलाला संधी न मिळाल्याचे दुःख जाहीर करताना ‘साई सुदर्शनऐवजी आपला मुलगा अभिमन्यूला संधी द्यायला हवी होती. कारण हिरवळीच्या विकेटवर खेळण्याचा त्याला चांगला अनुभव आहे. दुसऱ्या स्थानावर त्याला खेळायला हवे होते. साई सुदर्शनविषयी माझ्या मनात पुठलीही वाईट भावना नाही. पण प्रश्न हा आहे की, योग्य जागा कोणती? 0, 31, 0, 61 – हे आकडे बघा. ईडन गार्डन्सवर त्याने 30 टक्के सामने खेळले आहेत, जिथे हिरवळीच्या विकेट असतात. हिरवळीच्या विकेटवर खेळण्याचा त्याला अनुभव आहे. आकडेवारी सांगते की, अभिमन्यू दीर्घकाळ डाव सांभाळणारा फलंदाज आहे.’
n रंगनाथन यांनी असा आरोपही केला की, व्यवस्थापनाने अभिमन्यूशी अन्याय केला. ‘करुण नायर कधीही पहिल्या क्रमांकावर खेळलेला नाही.तो विदर्भासाठी नेहमी दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावरच उतरला आहे. मग तो पहिल्या क्रमांकावर कसा येऊ शकतो? अचानक चौथ्या-पाचव्या क्रमांकावर खेळणारा फलंदाज आघाडीला येतो? पण माझा मुलगा हा नैसर्गिक सलामीवीर आहे. तो तिसऱ्या-चौथ्या क्रमांकावर जाऊ शकत नाही. तो फक्त सलामीवीर म्हणूनच खेळू शकतो,’ असे त्यांनी स्पष्ट केले.
Comments are closed.