‘राजा शिवाजी’मधून अभिषेक बच्चनचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण, छत्रपतींच्या ज्येष्ठ बंधूंची साकारणार भूमिका

रितेश देशमुख याच्या ‘राजा शिवाजी’ हा बहुप्रतिक्षित ऐतिहासिक चित्रपट सध्या चित्रपटसृष्टीत चर्चेचा विषय ठरत आहे. या चित्रपटातून ज्युनियर बच्चन उर्फ अभिषेक बच्चन हा मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. हा त्यांच्या सिनेमाच्या प्रवासातील एक धाडसी आणि महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चन हे छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रमी ज्येष्ठ बंधू संभाजी शहाजी राजे भोसले यांची भूमिका साकारत आहेत.

आपल्या पहिल्या मराठी चित्रपटाबद्दल बोलताना अभिषेक बच्चन म्हणाला, “हा माझा पहिलाच मराठी चित्रपट आहे आणि याचा भाग होणे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. रितेश देशमुख याचे छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट बनवण्याचे स्वप्न अनेक वर्षांपासून आहे. मी रितेशला जवळपास २५ वर्षांपासून ओळखतो. लातूरमध्ये माझ्या ‘जमीन’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आमची पहिली भेट झाली. त्या वेळी मी अजय देवगणसोबत शूटिंग करत होतो आणि रितेश आम्हाला भेटायला आला होता. तिथूनच आमच्या मैत्रीची सुरुवात झाली आणि पुढे आम्ही अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले,” असे त्यांनी सांगितले.

अभिषेक पुढे म्हणाला की, एकदा रितेशच्या घरी भेट गेलो असता त्याने दिग्दर्शन करण्याचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट साकारण्याचे आपले स्वप्न असल्याचे सांगितले होते.

‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक टीझर ३१ मार्च रोजी डिजिटल माध्यमांवर प्रदर्शित झाला असून, त्याला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, जिनिलिया देशमुख आणि स्वतः रितेश विलासराव देशमुख यांसारख्या दिग्गज कलाकारांचा समावेश आहे, ज्यामुळे या चित्रपटाचा आवाका अधिकच भव्य झाला आहे.

‘जिओ स्टुडिओज’द्वारे सादर करण्यात आलेला आणि ‘मुंबई फिल्म कंपनी’च्या बॅनरखाली ज्योती देशपांडे व जिनिलिया देशमुख यांनी निर्मित केलेला ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट १ मे २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये मराठी, हिंदी आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Comments are closed.