IPL 2026: वरुण चक्रवर्तीच्या फॉर्मवरून चर्चांना उधाण; जाणून घ्या प्रशिक्षक अभिषेक नायर नेमकं काय म्हणाले?

आयपीएल 2026 च्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) स्टार गोलंदाज वरुण चक्रवर्तीच्या (Varun Chakrawarthy) खालावलेल्या फॉर्ममुळे संघात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, केकेआरचे मुख्य प्रशिक्षक अभिषेक नायर (Abhishek Nayar on Varun Chakrawarthy) यांनी स्पष्ट केले आहे की, फ्रँचायझी आपल्या या ‘मिस्ट्री स्पिनर’च्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील.

नायर यांच्या मते, अलीकडच्या सामन्यांत वरुणची कामगिरी खराब झाली असली, तरी तो पुन्हा फॉर्ममध्ये येण्यास सक्षम आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत नायर म्हणाले की, वरुण चक्रवर्ती मानसिकदृष्ट्या खूप मजबूत आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत अनेक चढ-उतार पाहिले असून, या कठीण काळातून बाहेर पडण्यासाठी तो सज्ज आहे. इतर संघ त्याला चांगले खेळत आहेत, पण याचा अर्थ असा नाही की तो पुनरागमन करू शकत नाही,” असे नायर यांनी नमूद केले.

विशेष म्हणजे, जानेवारी 2026 पर्यंत वरुण आयसीसी टी20 क्रमवारीत जगातील नंबर 1 गोलंदाज होता. वरुणसाठी या हंगामाची सुरुवात अत्यंत कठीण राहिली आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा आणि रयान रिकेल्टन यांनी त्याच्या गोलंदाजीवर जोरदार प्रहार करत 48 धावा कुटल्या, तिथे त्याला एकही विकेट मिळाली नाही. मधल्या षटकांमध्ये (Middle Overs) फलंदाज आता त्याच्यावर वरचढ ठरण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे वाढत्या दबावाखाली तो आपली ‘मिस्ट्री’ टिकवून ठेवणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

वरुणच्या फॉर्ममधील घसरण टी20 वर्ल्ड कपपासूनच जाणवू लागली होती. त्या स्पर्धेत त्याने 14 विकेट्स घेतल्या असल्या तरी, त्याचा इकॉनॉमी रेट 9.24 इतका जास्त होता. विशेषतः दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने 47 धावा खर्च केल्या होत्या. विश्लेषकांच्या मते, विरोधी संघांनी आता त्याच्या गोलंदाजीची पद्धत ‘डिकोड’ (ओळखली) केली आहे. फलंदाज आता त्याच्याविरुद्ध बचावात्मक खेळण्याऐवजी आक्रमक पवित्रा घेत आहेत.

अभिषेक नायर यांच्या मते, भारतीय संघासाठी उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे वरुणकडून अपेक्षा वाढल्या आहेत. आता प्रत्येक संघ केकेआरविरुद्ध खेळताना वरुणला लक्ष्य करण्याची विशेष रणनीती आखतो. नायर म्हणाले की, “जेव्हा एखादा खेळाडू यशस्वी होतो, तेव्हा त्याच्यासमोरील आव्हानेही वाढतात.” केकेआर व्यवस्थापनाने त्याला कठीण परिस्थितीत गोलंदाजी देण्याचा निर्णय घेतला असून, तो लवकरच पुन्हा विकेट्स मिळवून फलंदाजांसाठी एक ‘कोडे’ ठरेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

Comments are closed.