जी कामगिरी कोणताही भारतीय फलंदाज करू शकला नाही, ते अभिषेक शर्माने करून दाखवलं! टी-20 मध्ये रचला इतिहास
अभिषेक शर्मासाठी (Abhishek Sharma) 2025 हे वर्ष खूपच अप्रतिम ठरले आहे. टी-20 फॉरमॅटमध्ये अभिषेक शर्मा एकानंतर एक धमाकेदार कामगिरी करत आहे. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतही हा डावखुरा फलंदाज जबरदस्त खेळ दाखवत आहे. बंगालविरुद्ध 148 धावांची खेळी आणि बडोद्याविरुद्धच्या तुफानी अर्धशतकानंतर, अभिषेकने सर्विसेज संघाच्या गोलंदाजीवरही मनसोक्त फटकेबाजी केली.
सर्विसेजविरुद्धच्या आपल्या 34 चेंडूंच्या खेळीत अभिषेकने 182 च्या स्ट्राइक रेटने धुमाकूळ घातला. त्याने या आक्रमक खेळीत 8 चौकार आणि 3 मोठे षटकार मारले. दुसरा षटकार मारताच, अभिषेकने एक मोठा टप्पा गाठला, जिथे कोणताही भारतीय फलंदाज यापूर्वी पोहोचू शकला नव्हता. अभिषेक शर्माने एका कॅलेंडर वर्षात (2025 मध्ये) 100 षटकारांचा आकडा पूर्ण केला आहे. सर्विसेजविरुद्ध दुसरा षटकार मारून त्याने ही मोठी कामगिरी नोंदवली. एका वर्षात 100 षटकार मारणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. अभिषेकने यावर्षी आतापर्यंत खेळलेल्या 36 डावांमध्ये एकूण 101 षटकार लगावले आहेत.
सर्विसेजविरुद्ध नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या पंजाबला प्रभसिमरन सिंग आणि अभिषेक शर्मा यांनी धडाकेबाज सुरुवात करून दिली.
दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी 57 चेंडूंमध्ये 106 धावांची भागीदारी केली. प्रभसिमरन 50 धावांवर बाद झाला. मात्र, अभिषेकने आपली तुफानी फलंदाजी सुरू ठेवली आणि 34 चेंडूंमध्ये 62 धावांची आक्रमक खेळी केली. त्याने बाद होण्यापूर्वी प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांना अक्षरशः धुऊन काढले.
एका वर्षात सर्वाधिक षटकार मारण्याचा जागतिक विक्रम निकोलस पूरनच्या नावावर आहे, ज्याने 2024 मध्ये एकूण 170 षटकार मारले होते. अभिषेक आपला हाच फॉर्म 9 डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू होणाऱ्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतही कायम ठेवण्याच्या प्रयत्न करेल.
Comments are closed.