अभिषेक शर्माने मोडला युवराज सिंगचा 'हा' रेकॉर्ड, सनथ जयसूर्याचा 16 वर्षापूर्वीचा रेकॉर्डही पडला मागे
भारताचा विस्फोटक फलंदाज अभिषेक शर्मा याने आशिया कप 2025 मध्ये आपले दुसरे अर्धशतक झळकावले. त्याने बांगलादेशविरुद्ध आशिया कपच्या सुपर-4 सामन्यात 37 चेंडूत 75 धावा करत जबरदस्त खेळी केली. याबरोबरच त्याने आपला गुरु युवराज सिंग याचा मोठा रेकॉर्ड मोडला.
अभिषेक शर्मा टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 25 चेंडूत किंवा त्याहून कमी चेंडूत 5 वेळा 50+ धावा करणारा तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. याबरोबरच अभिषेकने आपल्या ‘गुरु’ युवराज सिंगला मागे टाकले आहे. सिक्सर किंग म्हणून प्रसिद्ध युवराजने हा कारनामा 4 वेळा केला होता.
भारतीय खेळाडूंपैकी सूर्यकुमार यादव हा 7 वेळा असा कारनामा साध्य करून या रेकॉर्ड लिस्टमध्ये पहिल्या स्थानावर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर सीनियर फलंदाज रोहित शर्मा आहे. हिटमॅनने हा कारनामा 6 वेळा केला आहे. आता सूर्य आणि रोहितनंतर अभिषेक या यादीत तिसऱ्या स्थानावर आले आहेत.
आशिया कप 2025 च्या 5 सामन्यांमध्ये अभिषेक शर्माने 16 षटकार ठोकले आहेत. हा आशिया कपच्या एखाद्या एका आवृत्तीमध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्याचा रेकॉर्ड आहे. याआधी हा रेकॉर्ड श्रीलंकेचे माजी दिग्गज ओपनर सनथ जयसूर्या यांच्याजवळ होता. जयसूर्याने 2008 आशिया कपमध्ये 14 षटकार ठोकले होते. तसेच, अभिषेक शर्मा या आशिया कपमध्ये 200 हून अधिक धावा करणारा एकटा फलंदाज आहे.
या सामन्यात बांगलादेशच्या वेगवान गोलंदाजांनी नवीन चेंडूने उत्कृष्ट सुरुवात केली. ते चेंडू दोन्ही बाजूंना स्विंग करत होते. बांगलादेशच्या गोलंदाजांनी भारतीय सलामी फलंदाजांना पहिल्या तीन ओव्हरमध्ये चांगले गाजवले, यावेळी अभिषेकला एक जीवनदान देखील मिळाले. या सामन्यात कर्णधार असलेले विकेटकीपर झाकिर अलीने तंजीम हसन साकिबच्या चेंडूवर कॅच सोडला. त्यानंतर अभिषेक आणि शुभमन गिल यांनी पावरप्लेमध्ये संघाचा स्कोर 72 धावांपर्यंत नेला. गिलने 19 चेंडूत 29 धावांची खेळी केली.
Comments are closed.