IND vs NZ: अभिषेक शर्मा फायनल खेळणार! ‘हा’ खेळाडू होणार बाहेर? टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनबाबत मोठी अपडेट समोर

भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील टी-20 वर्ल्ड कप 2026 (ICC T20 international world cup 2026) चा अंतिम सामना रविवार, 8 मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखालील टीम इंडिया या सामन्यात सलग दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवून इतिहास रचण्यासाठी सज्ज झाली आहे. मात्र, फायनलपूर्वी भारतीय संघाच्या ‘प्लेइंग इलेव्हन’बद्दल (Playing XI) मोठी चर्चा सुरू आहे.

भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) या वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकलेला नाही. टी-20 क्रिकेटमधील हा स्फोटक फलंदाज या स्पर्धेत तीन वेळा शून्यावर (डक) बाद झाला असून त्याची बॅट जवळपास शांतच राहिली आहे. सेमीफायनलमध्येही इंग्लंडविरुद्ध तो मोठी खेळी करू शकला नाही, त्यामुळे त्याच्या फॉर्मवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.

मात्र, ताज्या रिपोर्टनुसार, अभिषेक शर्माला फायनलमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. त्याला अगदी तसेच ‘बॅक’ (पाठिंबा) केले जात आहे, जसे 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीला (Virat Kohli) केले गेले होते. त्यावेळी कोहली देखील खराब फॉर्मशी झुंजत होता, पण त्याने फायनलमध्ये 76 धावांची खेळी करून भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती.

दुसरीकडे, अंतिम सामन्यासाठी ‘मिस्ट्री स्पिनर’ वरुण चक्रवर्तीला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसवले जाण्याची शक्यता आहे. त्याच्या जागी अनुभवी चायनामन गोलंदाज कुलदीप यादवला (Kuldeep Yadav) संघात स्थान दिले जाऊ शकते.

Comments are closed.