आकडे फिके, पण विश्वास पक्का! गिल-सूर्यकुमारच्या पाठीशी अभिषेक

फोटो – बीसीसीआय

टी-20 वर्ल्ड कपाच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ फलंदाज शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादव यांच्या फॉर्मबाबत सुरू असलेल्या चर्चांवर हिंदुस्थानचा सलामीवीर आणि सध्याचा जागतिक क्रमवारीत अव्वल टी-20 फलंदाज अभिषेक शर्माने ठाम शब्दांत उत्तर दिले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत दोघांच्या बॅटमधून मोठय़ा खेळी निघाल्या नसल्या तरी मोठय़ा व्यासपीठावर हेच खेळाडू हिंदुस्थानसाठी सामन्यांचे चित्र पालटतील, असा विश्वास अभिषेकने व्यक्त केला.

मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांत शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादव यांना मोठी धावसंख्या उभारता आलेली नाही. धर्मशाळा येथे झालेल्या तिसऱया टी-20 सामन्यात हिंदुस्थानच्या सात गडी राखून मिळालेल्या विजयात गिलची 28 धावांची खेळी ही दोघांमधील सर्वोच्च ठरली. तरीही त्यांच्या फॉर्मवर उपस्थित होणाऱया प्रश्नांना अभिषेकने साफ फेटाळले.

सामन्यानंतर अभिषेक शर्मा म्हणाला, “मी एक गोष्ट अगदी स्पष्ट सांगतो. माझ्यावर विश्वास ठेवा. हे दोन्ही खेळाडू वर्ल्ड कपमध्ये आणि त्याआधीही सामने जिंकून देतील. मी त्यांच्यासोबत बराच काळ खेळलो आहे, विशेषतः शुभमनसोबत. तो कोणत्या परिस्थितीत सामना जिंकू शकतो हे मला नेमके माहीत आहे.’’

अभिषेकने पुढे सांगितले की, गिलवर त्याचा सुरुवातीपासूनच विश्वास आहे आणि लवकरच चाहत्यांनाही याची प्रचीती येईल.

तिसऱया टी-20 सामन्यात 118 धावांचे सोपे लक्ष्य गाठताना अभिषेक-गिल या सलामी जोडीने हिंदुस्थानला भक्कम प्रारंभ करून दिला. अवघ्या 5.2 षटकांत दोघांनी 60 धावांची भागीदारी रचली. अभिषेकने 18 चेंडूंत झटपट 35 धावा केल्या, तर गिलने 28 चेंडूंत 28 धावांची संयमी खेळी साकारली. सूर्यकुमार यादव 12 धावांवर बाद झाला. हिंदुस्थानने 15.5 षटकांत लक्ष्य गाठत मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली.

या सामन्यातील खरी कहाणी मात्र हिंदुस्थानच्या वेगवान गोलंदाजांनी लिहिली. नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारलेल्या संघासाठी अर्शदीप सिंग (2/13), हर्षित राणा (2/34) आणि हार्दिक पंडय़ा (1/23) यांनी स्विंगचा अचूक वापर करत दक्षिण आफ्रिकेला 20 षटकांत अवघ्या 117 धावांत रोखले. या खेळपट्टीवर ही धावसंख्या अत्यंत अपुरी ठरली. दरम्यान, आपल्या फॉर्मबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर सूर्यकुमार यादवनेही आत्मविश्वास दाखवला.

Comments are closed.