ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर अभिषेक शर्माची दमदार कामगिरी! पहिल्याच टी20 मालिकेत जिंकला मोठा पुरस्कार

सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची 5 सामन्यांची टी20 मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली आहे. ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडियमवर झालेला 5 वा आणि शेवटचा सामना पावसामुळे रद्द झाला. तरीसुद्धा भारताने ऑस्ट्रेलियात टी20 मालिका जिंकण्याचा आपला विक्रम कायम ठेवला. या मालिकेत टीम इंडियाचा स्टार सलामीवीर अभिषेक शर्माने (Abhishek Sharma) अप्रतिम खेळ करून सर्वांचे लक्ष वेधले. ही त्याची ऑस्ट्रेलियातील पहिली टी20 आंतरराष्ट्रीय मालिका होती आणि त्याने चमकदार फलंदाजी करत “प्लेअर ऑफ द सिरीज” हा सन्मान पटकावला.

25 वर्षांचा डावखुरा फलंदाज अभिषेक शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला. त्याने मालिकेत जबरदस्त फलंदाजी केली आणि सर्वाधिक धावा केल्या. अभिषेकने 5 सामन्यांत 40.57 च्या सरासरीने आणि 161.38 च्या स्ट्राइक रेटने एकूण 163 धावा केल्या. या दरम्यान त्याने एक अर्धशतक झळकावले आणि त्याचा सर्वोच्च स्कोर 68 धावा राहिला. त्याने मालिकेत एकूण 18 चौकार आणि 6 षटकार ठोकले.

याआधीही अभिषेकने एशिया कप 2025 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत “प्लेअर ऑफ द टूर्नामेंट” हा किताब जिंकला होता.

मला या मालिकेची खूप आतुरता होती, असे अभिषेक म्हणाला. “जेव्हा मला समजले की मी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे, तेव्हा मी खूप उत्साहित होतो. मला फलंदाज आणि गोलंदाज यांच्यातील लढत नेहमीच आवडते. इथल्या खेळपट्टी फलंदाजीसाठी अतिशय चांगल्या आहेत, त्यामुळे आणखी मोठे स्कोअर व्हायला हवे होते, पण तरीही आमचं प्रदर्शन खूप चांगलं झालं.

तो पुढे म्हणाला, जोश हेजलवूडने उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्याचा सामना करणे हा एक जबरदस्त अनुभव होता, कारण तो वर्ल्ड क्लास गोलंदाज आहे. जर तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळायचं असेल आणि सातत्याने कामगिरी करायची असेल, तर अशा दर्जेदार गोलंदाजांविरुद्ध स्वतःला तयार ठेवावं लागतं.

मालिकेच्या अखेरच्या सामन्यात अभिषेक शर्माने केवळ 13 चेंडूंवर नाबाद 23 धावा करत टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या 1000 धावा पूर्ण केल्या.
त्यामुळे तो सर्वात कमी चेंडूंमध्ये टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1000 धावा करणारा खेळाडू ठरला. त्याने या बाबतीत कर्णधार सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला. अभिषेकने 528 चेंडूंमध्ये 1000 धावा केल्या, तर सूर्याने हा टप्पा 573 चेंडूंमध्ये गाठला होता.

तसेच, तो विराट कोहलीनंतर सर्वात कमी डावांमध्ये 1000 टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावा करणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. अभिषेकने हे यश 28 डावांत मिळवले, तर कोहलीने हे 27 डावांत केले होते.

Comments are closed.