14 चेंडूंत वादळी अर्धशतक! अभिषेक शर्माने रचला इतिहास; न्यूझीलंडच्या गोलंदाजांना एकट्याने पाजलं पाणी

भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा सामना 25 जानेवारीला गुवाहाटीच्या बरसापारा स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात अभिषेक शर्माने (Abhishek Sharma) जबरदस्त कामगिरी करत भारताला दमदार सुरुवात करून दिली. गेल्या सामन्यात ‘गोल्डन डक’वर आऊट झाल्यानंतर अभिषेकने या मॅचमध्ये न्यूझीलंडविरुद्ध जोरदार मोर्चा उघडला. त्याने रोहित शर्माचा एक मोठा रेकॉर्ड मोडला असून भारतासाठी दुसरं सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्याचा पराक्रमही केला आहे.
भारतासाठी टी-20 मध्ये अभिषेक शर्मा आता दुसरं सर्वात वेगवान अर्धशतक झळकावणारा फलंदाज ठरला आहे. त्याने केवळ 14 चेंडूत हा कारनामा केला. या यादीत पहिल्या क्रमांकावर युवराज सिंग आहे, ज्याने 12 चेंडूत अर्धशतक केलं होतं. याशिवाय, भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एका टी-20 मालिकेत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आतापर्यंत रोहित शर्माच्या नावे होता (10 षटकार). पण अभिषेकने आता 13 षटकार मारून रोहितला मागे टाकलं आहे.
अभिषेक शर्माने या सामन्यात 20 चेंडूत नाबाद 68 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 7 चौकार आणि 5 षटकार मारले. न्यूझीलंडने पहिल्यांदा बॅटिंग करताना 20 षटकांमध्ये 153/9 धावा केल्या होत्या, ज्याच्या उत्तरात भारताने केवळ 10 षटकांमध्ये 155/2 धावा करून सामना जिंकला. अभिषेकसोबतच सूर्यकुमार यादवनेही 26 चेंडूत 57 धावांची नाबाद खेळी केली. सूर्याने 6 चौकार आणि 3 षटकार खेचले.
Comments are closed.