SRH vs PBKS: 6, 6, 6, 6, 6… अभिषेक शर्माचा मैदानात धुमाकूळ! 18 चेंडूत तुफानी अर्धशतक ठोकत रचला इतिहास

जगातील नंबर-1 टी-20 फलंदाज अभिषेक शर्माने (Abhishek Sharma) शनिवारी (11 एप्रिल, 2026) आयपीएलच्या 17 व्या सामन्यात नवा इतिहास रचला आहे. सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना अभिषेकने पंजाब किंग्सविरुद्ध केवळ 28 चेंडूत 74 धावांची तुफानी खेळी केली. या खेळीत त्याने 5 चौकार आणि 8 उत्तुंग षटकार ठोकले. पंजाबच्या गोलंदाजांची धुलाई करत त्याने अवघ्या 18 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यासह अभिषेकने आयपीएलमध्ये एक असा विक्रम केला आहे, जो आजवर कोणालाही जमलेला नाही.

मुल्लांपुर येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात सलामीला आलेल्या अभिषेकने हैदराबादला धडाकेबाज सुरुवात करून दिली. त्याने मैदानात पाऊल ठेवताच आक्रमक पवित्रा घेतला आणि पाचव्या षटकात षटकार मारून अवघ्या 18 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. या अर्धशतकासह तो आयपीएल इतिहासात 20 पेक्षा कमी चेंडूत 5 वेळा अर्धशतक ठोकणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. यापूर्वी त्याने 16 चेंडूत, 18 चेंडूत आणि दोनदा 19 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या आहेत.

25 वर्षांचा अभिषेक आता या यादीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. त्याच्यानंतर निकोलस पूरनचा क्रमांक लागतो, ज्याने हा पराक्रम 4 वेळा केला आहे.

आयपीएलमध्ये 20 पेक्षा कमी चेंडूत सर्वाधिक अर्धशतके

5 – अभिषेक शर्मा (दिल्ली कॅपिटल्स, सनरायझर्स हैदराबाद)
4 – निकोलस पूरन (MI, PBKS, SRH, LSG)
3 – जेक फ्रेझर-मॅकगर्क (दिल्ली कॅपिटल्स)
3 – ट्रॅव्हिस हेड (RCB, SRH)
3 – वैभव सूर्यवंशी (राजस्थान रॉयल्स)

या सामन्यात अभिषेकने ट्रॅव्हिस हेडसोबत पहिल्या विकेटसाठी 120 धावांची भागीदारी केली. हेड 23 चेंडूत 38 धावा करून बाद झाला. या दोघांच्या फटकेबाजीमुळे सनरायझर्स हैदराबादने पॉवरप्लेमध्येच (पहिल्या 6 षटकात) 105 धावा केल्या. आयपीएल इतिहासात हैदराबादने तब्बल तीन वेळा पॉवरप्लेमध्ये 100 पेक्षा जास्त धावा करण्याचा पराक्रम केला आहे, तर इतर कोणत्याही संघाला एकदाही हे जमलेले नाही.

Comments are closed.