अभिषेक शर्माची ऐतिहासिक इनिंग! 'हा' विक्रम मोडून रोहित, विराट, युवराज यांनाही टाकले मागे

अभिषेक शर्मा टी-20 क्रिकेटमध्ये यंदा वादळी फॉर्मात आहे. त्याने या वर्षात एकापेक्षा एक उत्कृष्ट खेळी केल्या आहेत. सलामीला उतरत आक्रमक फलंदाजी करत गोलंदाजांवर हल्ला बोल करत खेळण्यात त्यांचा हातखंडा आहे. आयपीएल, भारत टी-20 संघ याचबरोबर त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी सामन्यात आपल्या कामगिरीचा जलवा कायम ठेवला. अभिषेक शर्माने टी-20 क्रिकेटमध्ये मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.

आयपीएल 2024 मध्ये सनरायझर्स हैदराबादसाठी खेळताना आपल्या आक्रमक फलंदाजीने प्रसिद्धी मिळवणारा अभिषेक शर्मा आपल्या षटकारांसाठी ओळखले जाते. यामुळे त्याला टीम इंडियामध्ये संधी मिळाली आणि तेव्हापासून अभिषेक शर्माने सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत आहे.

सर्वात जलद शतक आणि सर्वात जलद 1 हजार टी20 आंतरराष्ट्रीय धावा असे मोठे विक्रम आपल्या नावे केल्यानंतर, अभिषेकने आता आणखी एक मोठा टप्पा गाठला आहे. 2025 मध्ये अभिषेकने टी20 फॉरमॅटमध्ये 100 हून अधिक षटकार मारण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे. 6 डिसेंबरला झालेल्या सर्व्हिसेसविरुद्ध सय्यद मुश्ताक ट्रॉफी सामन्यात पंजाबकडून सलामीला येताना त्याने तीन षटकार मारले. यासह, अभिषेक फक्त 36 टी-20 डावात एका वर्षात सर्वाधिक 101 षटकार मारणारा पहिला भारतीय फलंदाज बनला.

अभिषेकने या बाबतीत स्वतःचाच विक्रम मोडला आहे. त्याने 2024 मध्ये टी-20 क्रिकेटमध्ये एकूण 87 षटकार लगावले होते, जे एका वर्षात एका भारतीय खेळाडूने मारलेले सर्वाधिक षटकार आहेत. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादव आहे, ज्याने 2022 मध्ये 85 षटकार लगावले होते.

अभिषेकने या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 47 षटकार लगावले आहेत. या वर्षी त्याने फक्त 17 डावांमध्ये 47 षटकार मारले आहेत. शिवाय, आयपीएल 2025 मध्ये त्याने 14 डावांमध्ये 28 षटकार मारले. अशाप्रकारे, टी-20 आंतरराष्ट्रीय आणि आयपीएलमध्ये 75 षटकार मारल्यानंतर, अभिषेकने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये 26 षटकार मारले. पंजाबच्या कर्णधाराने फक्त सहा डावांमध्ये 26 षटकार मारत 100 षटकारांचा ऐतिहासिक आकडा गाठला.

तर एका वर्षात सर्वाधिक षटकार लगावण्याचा विश्वविक्रम वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज निकोलस पूरनच्या नावे आहे. पूरनने 2024 मध्ये टी-20 क्रिकेटमध्ये एकूण 170 षटकार मारले होते. वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ख्रिस गेलने एका वर्षात सर्वाधिक सहा वेळेस 100 हून अधिक षटकार मारण्याचा अनोखा विक्रम केला आहे.

Comments are closed.