अभिषेक शर्माचा विश्वविक्रम! टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला खेळाडू

टीम इंडियाचा युवा सलामी फलंदाज अभिषेक शर्माने (Abhishek Sharma) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात 35 धावांची छोटी पण महत्त्वपूर्ण खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने एक मोठा विश्वविक्रम आपल्या नावावर केला.

अभिषेक शर्मा आता टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तीन वेळा डावाच्या पहिल्या चेंडूवर षटकार मारणारा जगातील पहिला फलंदाज बनला आहे.

भारताने 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारतासमोर 118 धावांचे माफक लक्ष्य होते. उपकर्णधार शुबमन गिल (Shubman gill) (28 धावा, 28 चेंडू) आणि सलामीचा भागीदार अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) (35 धावा, 18 चेंडू) यांनी पहिल्या विकेटसाठी 5.2 षटकांत 60 धावांची भागीदारी केली. या दमदार सुरुवातीमुळे भारताने 15.5 षटकांत सहज लक्ष्य गाठले.

धर्मशाळा येथे झालेल्या या तिसऱ्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात, वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला सामनावीर (Man of the Match) म्हणून गौरवण्यात आले.

त्याआधी भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या संघाला केवळ 117 धावांत गुंडाळले. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडेन मारक्रम (Aiden Markram) वगळता इतर कोणताही फलंदाज क्रीजवर टिकू शकला नाही. अर्शदीप सिंगने पहिल्याच षटकात रीझा हेंड्रिक्सला बाद केले आणि त्यानंतर आफ्रिकेचे विकेट्स एकामागोमाग पडत गेले. भारतासाठी वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह, हर्षित राणा आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. मारक्रमने एकट्याने 46 चेंडूंमध्ये 61 धावा केल्या, तर दुसरा सर्वाधिक स्कोर फरेरा (20 धावा) याचा होता. आफ्रिकेचे 8 फलंदाज दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत.

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघात दोन बदल करण्यात आले. अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराह यांच्याऐवजी हर्षित राणा आणि कुलदीप यादव यांना संघात स्थान मिळाले. दक्षिण आफ्रिकेने कॉर्बिन बॉश, ट्रिस्टन स्टब्स आणि एनरिच नॉर्त्जे यांना संघात परत बोलावले.

मालिकेतील पहिला सामना भारताने कटक येथे 101 धावांनी जिंकला होता. दुसरा सामना दक्षिण आफ्रिकेने 51 धावांनी जिंकून 1-1 अशी बरोबरी साधली होती. आता पुन्हा भारताकडे 2-1 अशी आघाडी आहे. या टी20 मालिकेतील उर्वरित दोन सामने 17 डिसेंबर रोजी लखनऊ आणि 19 डिसेंबर रोजी अहमदाबाद येथे खेळले जाणार आहेत.

Comments are closed.