रायगडातील रस्त्यांवर यमराजाचा फेरा; सहा महिन्यांत अपघातात 136 जणांचा बळी

वाहनांची वाढलेली वर्दळ, धोकादायक वळणे, रस्त्यांची झालेली दुरवस्था, भरधाव वाहने यामुळे रायगड जिल्ह्यातील रस्ते मृत्यूचा सापळा बनली आहेत. दिवसभरात जवळपास दोन ते तीन मोठे अपघात होत असून 1 जानेवारी ते 30 जून 2025 या सहा महिन्यांत जिल्ह्यात 335 अपघात झाल्याचे उघड झाले आहे. यामध्ये 136 जणांचा मृत्यू तर 413 जण जखमी झाले आहेत. पावसाळ्यात अपघातांची संख्या वाढण्याची शक्यता अधिक असल्याने वाहने सावकाश आणि सुरक्षितपणे चाल वण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
रायगड जिल्ह्यातून मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, मुंबई-पुणे जुना महामार्ग हे तीन प्रमुख महामार्ग जात आहेत याव्यतिरिक्त जिल्हाभरात विविध महामार्ग, राज्यमार्ग व जिल्हा मार्गाचे जाळे आहे. या मार्गांवर सध्या क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक सुरू असल्याचे दिसून येत असून अपघातांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. अपघात कमी करण्यासाठी वाहतूक विभागामार्फत अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत. चाल कांनी वाहन सावकाश चालवावे यासाठी ठिकठिकाणी पोस्टर्स लावण्यात आले आहेत. प्रमुख नाक्यांवर वाहनचालकांची तपासणी करतानाच त्यांच्यामध्ये जागृती करण्यात येत आहे. वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर धडक कारवाई हाती घेतली आहे. मात्र त्यानंतरही अपघातांची संख्या वाढली आहे. मागील सहा महिन्यांत जिल्ह्यात 335 अपघात झाले असून, यामध्ये 136 जणांचा मृत्यू झाला आहे.
अपघाताची कारणे –
महामार्गाची संपूर्ण माहिती नसताना वेगाने वाहन चालविणे.
रस्त्यालगत इंडिकेटर न लावता थांबलेली वाहने.
रस्त्यावरील खड्डे चुकविण्याचा प्रयत्न करणे.
कोणतीही पूर्वकल्पना न देता वाहन दुसऱ्या बाजूला नेणे.
मद्य पिऊन वाहन चालविणे.
धोकादायक वळणे.
Comments are closed.