भिवंडीच्या तुरुंगातील लोखंडी जाळी तोडून आरोपी फरार
सोनसाखळी आणि मोबाईल चोरी प्रकरणी तुरुंगवास भोगणारा सराईत आरोपी भिवंडी सब जेलमधून फरार झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. रवींद्र भोसले (२८) असे चोरट्याचे नाव आहे. दरम्यान पोलिसांनी त्याला औषध व जेवण देण्यासाठी सब जेलमधून बाहेर काढले होते. त्यावेळी त्यांची नजर चुकवत रवींद्रने लोखंडी जाळी तोडली आणि पोबारा केला.
भिवंडी गुन्हे शाखेने आठ दिवसांपूर्वी रवींद्र भोसले याला मोबाईल व सोनसाखळी चोरी केल्याप्रकरणी बेड्या ठोकल्या होत्या. त्याच्याविरोधात भिवंडी, कल्याण, ठाणे, उल्हासनगर, कर्जत रेल्वे व पुणे रेल्वे अशा विविध पोलीस ठाण्यात सोनसाखळी चोरीचे १३ व मोबाईल चोरीचे ३ असे एकूण १६ गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले होते. त्याच्याकडून पोलिसांनी १५ तोळे सोन्याचे दागिने व २१ मोबाईल असा ८ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता.
न्यायालयाने रवींद्रला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्याला तहसीलदार कार्यालय आवारातील सब जेलमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून त्याचा शोध सुरू आहे.
Comments are closed.