कोर्टातून फरार झालेल्या विकृताने अत्याचार करून चिमुकलीची केली हत्या, प्लास्टिक गोणीत आढळला मृतदेह

न्यायालयातून फरार झालेल्या विकृताने एका सात वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना काटई येथील मांगत पाड्यात घडली आहे. या विकृताच्या पोलिसांनी पाच तासात मुसक्या आवळल्या असून त्याला येत्या बुधवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. या नराधमाने १३ सप्टेंबर २०२३ रोजी एका सहा वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या केली होती. त्याप्रकरणी पोलीस त्याला भिवंडी न्यायालयात घेऊन आले असता तो न्यायालयातून फरार झाला होता.

काटई ग्रामपंचायत हद्दीतील मांगत पाडा येथील सात वर्षीय चिमुरडी दुपारी ३ वाजता शौचालयात गेली ती पुन्हा घरी आलीच नाही. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. नजीकच्या चाळीतील एका बंद खोलीच्या झरोक्यातून आत पाहिले असता खोलीत चिमुरडीने शौचालयास जाताना सोबत नेलेली बादली आढळून आली. त्यानंतर नागरिकांनी खोलीचे कुलूप तोडून खोलीत प्रवेश केला. त्यावेळी तिथे एका कोपऱ्यात प्लास्टिक गोणीत चिमुरडीचा मृतदेह सापडला. त्यानंतर पोलिसांनी सलामत अन्सारी (३४) या विकृतावर झडप घातली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. हा आरोपी मूळचा बिहार राज्यातील मधुबनी येथील आहे. त्याने गेल्या दोन वर्षांपूर्वी फेणेगाव येथील चाळीत एका सहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या केली होती.

Comments are closed.