कनिष्ठ न्यायाधीशांवर कारवाई

वृत्तसंस्था / प्रयागराज

उत्तर प्रदेशातील अलाहाबाद उच्च न्यायालयाने गाझियाबाद येथील एक कनिष्ठ न्यायाधीशावर कठोर कारवाई केली आहे. या कनिष्ठ न्यायाधीशाने संपत्तीसंबंधीच्या एका विवाद प्रकरणात जाणून बुजून चुकीचा निर्णय दिला, असे ताशेरे उच्च न्यायालयाने ओढले असून या न्यायाधीशाच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची सूचना केली आहे. कनिष्ठ न्यायाधीशाचा हा निर्णय म्हणजे, ‘दिवसाढवळ्या केलेली न्यायाची हत्या’ आहे, अशी कठोर टिप्पणीही उच्च न्यायालयाने केली आहे.

हा विवाद इंद्र मोहन सचदेव विरुद्ध गाझियाबाद महानगरपालिका असा होता. या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने सचदेव याच्या बाजूने निर्णय दिला. मात्र, हा निर्णय केवळ चुकीचा नव्हे, तर तो हेतुपुरस्सर दिला गेला आहे, असा निष्कर्ष उच्च न्यायालयाने काढला आहे. सचदेव यांनी सत्य परिस्थिती लपवून महानगर पालिकेविरोधात बनावट प्रकरण सादर केले आहे, असे महानगरपालिकेचे म्हणणे होते. जी व्यक्ती एखाद्या घरात भाड्याने राहते ती त्या घराचा कर भरत असली, तरी ती घराचा मालक होऊ शकत नाही, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदविले आहे. आता कनिष्ठ न्यायाधीशाविरोधात कारवाई करावी लागणार आहे.

Comments are closed.