सत्तेवर येत असल्यास 'मत चोरी' च्या विरोधात कारवाई

बिहारमधील यात्रेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधींचे वक्तव्य :  प्रत्येक मतदारसंघात ‘वोट चोरी’चा पर्दाफाश करणार

सर्कल/ नवाडा

बिहारमध्ये सुरू असलेली काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ‘वोट अधिकार यात्रा’ मंगळवारी नवादा येथे पोहोचली. यादरम्यान तेथे उपस्थित समर्थकांना राहुल गांधी यांच्यासह राजद नेते तेजस्वी यादव यांनी संबोधित केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत महाआघाडीचे सरकार सत्तेवर लोकांनी आणावे आणि मग त्यानंतर राहुल गांधी लवकरच देशाचे पंतप्रधान होतील असे वक्तव्य तेजस्वी यादव यांनी केले. तर राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित करत सर्व मतदारसंघांमधील वोटचोरीचा पर्दाफाश करणार असल्याचा दावा केला आहे. आमचे सरकार स्थापन झाल्यावर ‘वोट चोरी’ विरोधात कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा राहुल यांनी दिला आहे. तर पूर्ण देश निवडणूक आयोगाकडून प्रतिज्ञापत्र मागणार आहे. वेळ मिळाल्यास आमचा पक्ष प्रत्येक विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघात ‘वोट चोरी’चा पर्दाफाश करणार असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.

बिहारमधील लाखो लोकांची नावे मतदारयादीतून हटविण्यात आली आहेत. भाजप आणि निवडणूक आयोगात पार्टनरशिप आहे. राज्यघटना सर्वांना अधिकार देते, हा अधिकार पंतप्रधान मोदी आणि अमित शाह हिरावू पाहत आहेत. महाराष्ट्रात एक कोटी मतांची चोरी झाली. हे लोक कोण आहेत हे आयोग सांगणे टाळत आहे. आता बिहारमध्ये नव्या पद्धतीने चोरी होत असून आम्ही हे होऊ देणार नाही. भाजप आणि निवडणूक आयोगाला झुकवेपर्यंत शांत बसणार नाही असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. एसआयआरच्या निमित्ताने गरीब लोकांचे नाव मतदार यादीतून हटविण्याचा कट रचला जात आहे. प्रथम भाजप लोकांचे मतदार ओळखपत्र काढून घेईल, मग रेशन कार्ड आणि अखेरीस जमीन काढून घेणार आहे. हा देश अदानी-अंबानी यांचा नसून शेतकरी आणि मजुरांचा असल्याचे वक्तव्य राहुल यांनी केले आहे.

एक बिहारी प्रत्येकावर भारी आहे

भाजप लोकांचा मताधिकार हिरावू पाहत आहे. निवडणूक आयोग आणि भाजप बिहारच्या जनतेला फसवू असा विचार करत आहेत. परंतु एक बिहारी सब पर भारी असल्याचे तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे अचेत अवस्थेत आहेत.  यावेळी 20 वर्षे जुने ‘खटारा’ सरकार सत्तेवरुन दूर करायचे आहे. सर्व जात-धर्मांना आम्ही बरोबर घेऊन वाटचाल करणार आहोत. आम्ही नव्या युगाचे प्रतिनिधित्व करतो. बिहार देशातील सर्वात युवा राज्य असून हे सरकार आमच्या युवांच्या भविष्याशी खेळत असल्याचा आरोप तेजस्वी यांनी केला आहे.

राहुल गांधी पंतप्रधान होतील

पुढील लोकसभा निवडणुकीत इंडी आघाडीचा विजय होऊन राहुल गांधी पंतप्रधान होतील, असा दावा नवादा येथे वोटर अधिकार यात्रेला संबोधित करताना तेजस्वी यादव यांनी केला आहे. जे मतदार लोकसभा निवडणुकीवेळी जिवंत होते, त्यांना आता मृत घोषित करण्यात आल्याचा आरोप तेजस्वी यांनी केला आहे.

Comments are closed.